अणदूरच्या प्रश्नांवर युवा ग्रामस्थ आक्रमक; १० जुलैला ग्रामपंचायतीसमोर आंदोलनाचा इशारा

अणदूर,दि.५ जुलै:

 गावातील अतिक्रमण, पाळीव डुकरांचा वाढता उपद्रव, मंदिर परिसरातील अस्वच्छता आणि कथित बेकायदेशीर दारू विक्रीसह विविध गंभीर प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अन्यथा १० जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अणदूरच्या युवा ग्रामस्थांनी दिला आहे.

याबाबत युवा ग्रामस्थांच्या वतीने ग्रामविकास अधिकारी संजय माशाळे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात अणदूरच्या मुख्य प्रवेशद्वारासह उड्डाणपुलाखालील ब्रिज परिसरातील सर्व अतिक्रमणे तातडीने हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.
गावातील पाळीव डुकरांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असून, अनेक लहान मुलांनाही डुकरांनी चावा घेतल्याच्या घटना घडत असल्याने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच श्री खंडोबा मंदिर परिसरात नियमित स्वच्छता ठेवावी, गावातील विविध ठिकाणी सुरू असलेली कथित बेकायदेशीर दारू विक्री तात्काळ बंद करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या सर्व मागण्यांवर त्वरित कार्यवाही न झाल्यास १० जुलै २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा युवा ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे.
यावेळी रवी मुळे, आण्णा महाराज घोडके, गणेश नरे, सुशांत राजमाने, राजकुमार गाढवे, संकेत चव्हाण यांच्यासह अनेक युवा ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top