नळदुर्ग बसस्थानकाला ‘२४ तास’ वाहतूक नियंत्रक मिळणार?; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पालकमंत्र्यांना साकडे
नळदुर्ग, दि. २५ऑगस्ट :
नळदुर्ग बसस्थानकातील रात्रीच्या एसटी वाहतुकीचा प्रश्न आता परिवहन विभागाच्या पातळीवर पोहोचला असून, बसस्थानकासाठी २४ तास वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपचे सोशल मीडिया तालुका प्रमुख तथा संयोजक किशोर पांडुरंग धुमाळ यांनी एसटी महामंडळाच्या धाराशिव विभागीय वाहतूक नियंत्रक अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या मागणीसाठी परिवहनमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना शिफारसपत्र दिले आहे.
आमदार पाटील यांनी दि. १० मार्च २०२६ रोजी पालकमंत्री सरनाईक यांना दिलेल्या पत्रात नळदुर्ग बसस्थानकासाठी २४ तास वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती करण्याबरोबरच आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
पत्रात नमूद केल्यानुसार, नळदुर्ग येथील बसस्थानक हे परिसरातील नागरिक, विद्यार्थी व पर्यटकांसाठी महत्त्वाचे केंद्र असून, दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा येथून होत असते. मात्र, बसस्थानकावर २४ तास वाहतूक नियंत्रक उपलब्ध नसल्यामुळे बससेवेचे नियोजन व नियंत्रण करण्यात अडचणी निर्माण होतात. परिणामी प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे आमदारांनी पत्रातून निदर्शनास आणून दिले आहे.
त्यामुळे नळदुर्ग बसस्थानकासाठी २४ तास वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती करून आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.
रात्रीच्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
नळदुर्ग बसस्थानकावर रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत वाहतूक नियंत्रक नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. काही एसटी बस बसस्थानकात न थांबता बायपासमार्गे जात असल्याच्या तक्रारी असून, काही प्रवाशांना महामार्गावर उतरविले जात असल्याचेही सांगण्यात येते. विशेषतः महिला भाविक व महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.
नळदुर्ग हे तुळजापूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाचे ठिकाण असून, कर्नाटकसह विविध भागांतून रात्रीच्या वेळी येथे प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे बसस्थानकावर २४ तास वाहतूक नियंत्रक उपलब्ध झाल्यास बसचे नियोजन, प्रवाशांना मार्गदर्शन आणि रात्रीच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
बसस्थानकाच्या सुरक्षेलाही बळ
नळदुर्ग बसस्थानकातून काही वर्षांपूर्वी एसटी बस चोरीला जाण्याची घटना घडली होती. त्यामुळे केवळ प्रवाशांची सोय नव्हे, तर बसस्थानकातील एसटी बसेसच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही रात्रीच्या वेळेत जबाबदार वाहतूक नियंत्रकाची उपस्थिती महत्त्वाची ठरणार आहे.
‘पाठपुरावा सुरूच ठेवणार’
नळदुर्ग बसस्थानकातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी आपण संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या शिफारसपत्रासह आता हा विषय परिवहनमंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पोहोचला आहे. २४ तास वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती आणि आगाऊ आरक्षणाची सुविधा मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार, असे किशोर धुमाळ यांनी सांगितले.