डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज; मिरवणूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तिघांविरुद्ध 
 स्वतंत्र गुन्हे दाखल

धाराशिव, दि. १६ सप्टेंबर : 

गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बी साउंड सिस्टीमचा आवाज निर्धारित ध्वनी तीव्रतेपेक्षा अधिक ठेवून कर्णकर्कश पद्धतीने वादन करणे तसेच मिरवणुकीतील आरास व ध्वनिक्षेपकांबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी डॉल्बी साउंड सिस्टीम ऑपरेटरसह तिघांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० ते रात्री ९.४५ या कालावधीत गणेशोत्सवाच्या मिरवणुका काढण्यात आल्या. या वेळी संबंधितांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांनुसार तसेच पारंपरिक पद्धतीने वाद्य न लावता वाहनावर अधिक उंचीवर व क्षमतेपेक्षा अधिक रुंदीची आरास उभारल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या आरासीमुळे सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण होण्यासोबतच विद्युत तारांना लागून गणेशमूर्तीचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण होईल, अशा पद्धतीने मिरवणूक काढल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर डॉल्बी साउंड सिस्टीमचा आवाज निर्धारित ध्वनी मर्यादेपेक्षा अधिक व कर्णकर्कश ठेवण्यात आल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी सचिन शंकर शिंदे (वय ३८, रा. मांडवे, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर), यशराज बाबासाहेब गाठे (रा. धाराशिव, ता. जि. धाराशिव) आणि पोपट रावसाहेब पवार (वय ४४, रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३, २८९, २९२, २९३, ३(५), पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलम ३ व १५ तसेच ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० मधील कलम ३, ४, ५ व ६ अन्वये कारवाई केली आहे.

गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषण, सार्वजनिक रहदारी आणि सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top