सोयाबीनच्या शेतात उत्पादनाचा दुष्काळ!
पिक कापणी प्रयोगातून दुष्काळाचे विदारक वास्तव; सोयाबीन उत्पादनात मोठी घट,
अर्ध्या गुंठ्यात कुठे १ किलो १३५ ग्रॅम, तर कुठे १ किलो ८३५ ग्रॅम; पीक कापणी प्रयोगातून दुष्काळाची भीषणता उघड

शिवाजी नाईक 
_________________
नळदुर्ग, दि. ६ ऑक्टोंबर : 

पावसाने पाठ फिरवली अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत उभे पीक करपून गेले! नळदुर्ग शिवारातील पीक कापणी प्रयोगात सोयाबीन उत्पादनाची अक्षरशः दाणादाण उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. अर्ध्या गुंठ्यात कुठे अवघे १ किलो १३५ ग्रॅम, तर दुसऱ्या शेतात १ किलो ८३५ ग्रॅम सोयाबीन निघाले. या आकडेवारीने पावसाअभावी खरीप हंगामाची झालेली वाताहत आणि शेतकऱ्यांच्या हातात येणाऱ्या उत्पादनाची भीषण स्थिती स्पष्ट झाली आहे.
सोमवारी (दि. ५) कृषी विभागाचे अधिकारी, एआयसी पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत नळदुर्ग शिवारात दोन ठिकाणी पीक कापणी प्रयोग घेण्यात आले. कंदुरमळा येथील प्रयोगात हेक्टरी अवघे २ क्विंटल २९ किलो, तर पाटील तांडा येथील प्रयोगात ३ क्विंटल ६७ किलो सरासरी उत्पादन निघाले. त्यामुळे पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उत्पादनाच्या आधारे न्याय भरपाई मिळणार का, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
 पावसाने दिलेल्या दीर्घ ओढीचा फटका यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाला बसला असून, नळदुर्ग शिवारातील पिक कापणी प्रयोगातून दुष्काळाचे विदारक वास्तव समोर आले आहे. कंदुरमळा येथे झालेल्या प्रयोगात अवघ्या अर्ध्या गुंठ्यात १ किलो १३५ ग्रॅम, तर पाटील तांडा येथील प्रयोगात १ किलो ८३५ ग्रॅम सोयाबीनचे उत्पादन निघाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोमवारी (दि. ५) कृषी विभागाचे अधिकारी, एआयसी पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नळदुर्ग शिवारात दोन ठिकाणी पीक कापणी प्रयोग घेण्यात आले.

कंदुरमळा येथील शेतकरी मिनहाजबेगम अबूबकर कुरेशी यांच्या ६३ गुंठे क्षेत्रातील सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली. यापैकी अर्ध्या गुंठ्यात पीक कापणी प्रयोग घेतला असता केवळ १ किलो १३५ ग्रॅम उत्पादन मिळाले. त्यानुसार हेक्टरी सरासरी २ क्विंटल २९ किलो उत्पादन येत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर पाटील तांडा येथील शेतकरी श्रीधर देविदास नरवडे यांच्या ६७ गुंठे क्षेत्रातील सोयाबीन पिकाचा प्रयोग करण्यात आला. अर्ध्या गुंठ्यातील कापणीत १ किलो ८३५ ग्रॅम सोयाबीनचे उत्पादन मिळाले. त्यानुसार हेक्टरी सरासरी ३ क्विंटल ६७ किलो उत्पादन निघाले.
पावसाने सुरुवातीपासूनच पाठ फिरवल्याने सोयाबीन पिकाची वाढ खुंटली असून, दाणे भरण्याच्या अवस्थेतही पिकाला पुरेसा पाऊस मिळाला नाही. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. प्रत्यक्ष शेतातील पीक कापणी प्रयोगामुळे दुष्काळाची तीव्रता आणि शेतकऱ्यांवरील संकट अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर पीक विमा व दुष्काळी मदतीबाबत शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

यावेळी नळदुर्ग मंडळ कृषी अधिकारी आर.एन. पवार, उपकृषी अधिकारी डी.पी. बिराजदार, सहाय्यक कृषी अधिकारी वाय.डी. क्षिरसागर, पोलीस पाटील बसवराज सांगवे, कबाडे भीमाशंकर, एआयसी कंपनीचे पीक विमा प्रतिनिधी एस.एल. कांबळे, शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप जोशी, सरदारसिंग ठाकूर, महेश घोडके, आजमोद्दीन शेख, प्रतापसिंग ठाकूर, बालाजी ठाकूर, रहमान शेख, बखर कुरेशी आदी उपस्थित होते.
 
Top