नळदुर्ग पोलिसांना निवेदन देताना सकल हिंदु समाजाचे पदाधिकारी.
सात दिवसांत अतिक्रमणे हटवा; अन्यथा २ नोव्हेंबरला उपोषण!
नळदुर्ग वाहतूक कोंडीचा प्रश्न ; सकल हिंदू समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र

नळदुर्ग, दि. २४ ऑक्टोंबर : 

नळदुर्ग, दि. २४ : शहरातील अक्कलकोट रोड, मुख्य रस्ता आणि बसस्थानक परिसरातील अतिक्रमणांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सात दिवसांत ठोस कार्यवाही करावी; अन्यथा २ नोव्हेंबर रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यासमोर शांततामय उपोषण करण्याचा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या स्मरणपत्रातून देण्यात आला आहे.
नळदुर्ग शहरातील प्रमुख रस्त्यांवर मच्छी विक्रेते, फळ विक्रेते, हातगाड्या, हॉटेलसमोरील दुचाकी तसेच रस्त्यावर ठेवण्यात येणाऱ्या व्यापारी साहित्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. बसस्थानकासमोरील परिसर आणि शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त उभी केली जात असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. याचा त्रास शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

वाहतूक कोंडीमुळे एसटी बस आणि शालेय वाहनांना मार्ग काढताना अडचणी येत आहेत. पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणेही धोकादायक बनले असून अपघाताची शक्यता वाढली आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ८ जून २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाणे आणि नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्याप  कार्यवाही झाली नसल्याचा आरोप सकल हिंदू समाजाने केला आहे.

बसस्थानक परिसरात बंद असलेल्या पोलीस चौकीत कायमस्वरूपी दोन पोलीस कर्मचारी नियुक्त करावेत, प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करावी आणि रस्त्यावर बेकायदेशीररीत्या वाहने उभी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच अतिक्रमणे हटवून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करावेत आणि केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

दि.२ नोव्हेंबरला उपोषणाचा इशारा

प्रशासनाने सात दिवसांत अतिक्रमण हटवून वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी न लावल्यास सोमवार, २ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता नळदुर्ग पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा  इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडून सामाजिक तणाव अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, असेही नमूद करण्यात आले आहे.

या स्मरणपत्रावर सकल हिंदू समाजाचे गणेश मोरडे, रवी सुरवसे आणि विजय ठाकूर यांच्या वतीने मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनाच्या प्रती पोलीस अधिक्षक धाराशिव, अपर तहसीलदार नळदुर्ग, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि नळदुर्ग पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top