दहिटणा गावात विकासकामांचा धडाका; मूलभूत सुविधांवर ग्रामपंचायतीचा भर!

पाच रुपयांत १५ लिटर शुद्ध पाणी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, स्मशानभूमी दहनशेडसह विविध कामे पूर्ण

नळदुर्ग, दि. १३ ऑक्टोंबर :

‘गावाचा विकास हाच ग्रामसमृद्धीचा पाया’ हे उद्दिष्ट समोर ठेवून तुळजापूर तालुक्यातील दहिटणा ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा, सिमेंट काँक्रीट रस्ते, बंदिस्त गटारे, सार्वजनिक सुविधा आणि नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची वेळेत उपलब्धता अशा विविध बाबींवर ग्रामपंचायतीने भर दिला आहे.

ग्रामस्थांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, यासाठी आरओ यंत्रणेद्वारे अवघ्या पाच रुपयांत १५ लिटर पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक घराला नळजोडणी देऊन पुरेसा पाणीपुरवठा करण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

गावातील मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणासोबत सामाजिक विकासालाही प्राधान्य देण्यात आले आहे. मागासवर्गीय वस्तीत सिमेंट काँक्रीट रस्ते आणि बंदिस्त गटारांची सोय करण्यात आली आहे. इंदिरानगर वस्तीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे काम पूर्ण करण्यात आले असून, सार्वजनिक स्मशानभूमीत दहनशेड उभारण्याचे कामही पूर्ण झाले आहे.

बालकांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडीला आवश्यक साहित्य पुरविण्यात आले आहे. याशिवाय गावात दिवाबत्तीची व्यवस्था, सुरळीत पाणीपुरवठा आणि ग्रामस्थांना विविध शासकीय कामांसाठी लागणारी कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.

मूलभूत सुविधा, सामाजिक विकास आणि नागरिकांना वेळेत सेवा या बाबींचा समन्वय साधत दहिटणा ग्रामपंचायतीने गावाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. या कामांमुळे ग्रामस्थांना दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या सुविधांचा लाभ मिळण्यास मदत होत आहे.अशी माहिती  ग्रामपंचायत अधिकारी महेश मोकाशे यांनी दिली.

 सरपंच  श्रीमती शिवकांता  कांबळे, उपसरपंच  माधुरी  पाटील, ग्रामपंचायत सदस्य  बाबुराव वाघमारे, लोचनाबाई  वाघमारे, रूक्मिणी  गुड्डे, उमाकांत  कदम, चंद्रकला कदम, निखिल  पाटील, कर्मचारी  अमोल कुंभार, अंकुश पवार आदींचे महत्वपूर्ण योगदान लाभत आहे.
 
Top