चार महिने उलटूनही नळदुर्ग शहरात वारंवार वाहतूक कोंडी कायम!
बसस्थानक पोलीस चौकीत कायमस्वरूपी दोन कर्मचारी नेमा; नगराध्यक्ष बसवराज धरणे यांची मागणी

नळदुर्ग, दि. २३ ऑक्टोंबर :

 शहरातील बसस्थानकासमोरील अक्कलकोट रस्ता आणि शहरात जाणाऱ्या मुख्य मार्गावरील बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या समस्येवर कारवाई करण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी दि.१४ जुलै २०२६ रोजी महामार्ग पोलीस केंद्र आणि नळदुर्ग पोलीस ठाण्याला लेखी पत्र दिले होते. मात्र, चार महिने उलटत आले तरी ठोस कारवाई झालेली नसल्याने नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बसस्थानकासमोरील परिसर हा शहरातील प्रमुख आणि अतिवर्दळीचा भाग बनला आहे. या ठिकाणी दुकाने,मासे विक्रेते ,हॉटेल्ससमोर दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन किरकोळ वाद घडत आहेत. तसेच, मोठ्या अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.

या मुख्य रस्त्यावरून शाळा-महाविद्यालयात ये-जा करणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि परगावी जाणारे चाकरमानी यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे बेशिस्त पार्किंगचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर बसस्थानक परिसरातील पोलीस चौकीत कायमस्वरूपी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. तसेच, रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करून आवश्यकतेनुसार वाहने जप्त करावीत, अशी मागणी  केली जात आहे.

अनुचित प्रकार घडल्यास जातीय तणावाची शक्यता
अक्कलकोट रोड व शहरात जाणारा मुख्य रस्ता व परिसर नेहमीच गजबजलेला असल्याने येथे एखादा अनुचित प्रकार घडल्यास जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. नगरपालिकेने लेखी पत्र देऊनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. यापुढेही दुर्लक्ष झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागावी लागेल, असा इशारा नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी दिला.
याप्रकरणी सकल हिंदु समाजाच्या वतीने दि.८/६/२०२६ रोजी न.प. प्रशासनास  निवेदन देऊन वाहतुक कोंडी दुर करण्याची मागणी केली होती.

आता नगरपालिकेच्या मागणीची दखल घेऊन पोलीस प्रशासन बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 
Top