बंजारा एसटी आरक्षण परिषदेसाठी धाराशिवमधून मोठ्या सहभागाचे आवाहन
जालना येथे रविवारी राज्यस्तरीय परिषद; विलास राठोड यांचे आवाहन

धाराशिव, दि. ३१ ऑक्टोंबर : 

बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी समाजाच्या वतीने सुरू असलेल्या लढ्याला व्यापक स्वरूप देण्याच्या उद्देशाने रविवारी (दि. १ नोव्हेंबर) जालना येथे राज्यस्तरीय बंजारा एसटी आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला धाराशिव जिल्ह्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष विलास राठोड यांनी केले आहे.

जालना येथील अंबड चौफुली येथे सकाळी ११ वाजता ही परिषद होणार आहे. बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करून त्यानुसार संविधानिक सवलती व आरक्षणाचा लाभ देण्यात यावा, ही समाजाची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.

आरक्षणाच्या मागणीला बळ देण्यासाठी तसेच समाजाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला आणि समाजबांधवांनी एकजुटीने परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन राठोड यांच्यासह जिल्हाध्यक्ष वसंत पवार, गोरनायक शिवाजी नाईक, कोषाध्यक्ष किरण राठोड आणि मनोज चव्हाण यांनी केले आहे.

बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला व्यापक जनसमर्थन मिळवून देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top