‘ज्येष्ठ म्हणजे चालते-बोलते संस्कारपीठ; कुटुंबाला दिशा देण्याची जबाबदारी त्यांची’
प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी; समर्थ ज्येष्ठ नागरिक संघात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात

सोलापूर, दि. १ ऑक्टोंबर  :

“ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजाचे चालते-बोलते संस्कारपीठ आहेत. त्यांच्या अनुभवातून पुढील पिढीला जीवनाची दिशा मिळते. कुटुंबातील सुसंवाद आणि संस्कारांची वीण घट्ट ठेवण्याची जबाबदारी ज्येष्ठांनी समर्थपणे पार पाडली पाहिजे,” असे प्रतिपादन प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी यांनी केले.

शेळगी येथील समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ, शेळगी परिसर, सोलापूर (फेस्कॉम संलग्न) यांच्या वतीने विरंगुळा केंद्रात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. कलशेट्टी बोलत होते.

ज्येष्ठांच्या आयुष्याबाबत भाष्य करताना प्रा. कलशेट्टी म्हणाले, “माणसाने समोरच्याला ताट द्यावे; मात्र बसण्यासाठी पाट देऊ नये. पुत्रप्रेमापोटी ताटासोबत पाटही देणाऱ्या वृद्धांच्या वाट्याला पुढे अनेकदा दयनीय जीवन येते.” माणसाच्या मनातील विचार आणि अविचार यातील संघर्षाचा उल्लेख करून त्यांनी सकारात्मक विचारांची जडणघडण करण्याचे आवाहन केले. मन प्रसन्न व सकारात्मक ठेवणे हे उत्तम आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे प्रत्यक्ष संवाद कमी होत असल्याची खंत व्यक्त करताना त्यांनी संवाद ही माणसाची मूलभूत आत्मिक गरज असल्याचे सांगितले. परस्पर संवादातून आत्मविश्वास वाढतो आणि नात्यांमध्ये जिव्हाळा निर्माण होतो. त्यामुळे ज्येष्ठांनी कुटुंबीयांसह समाजातील विविध घटकांशी सुसंवाद साधत आपला अनुभव पुढील पिढीपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.

“भरकटलेल्या जहाजाला दिशा दाखविण्यासाठी होकायंत्र जसे महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे कुटुंब, तरुणाई आणि समाजाला योग्य दिशा देण्याचे काम ज्येष्ठांनी करावे. ज्येष्ठ हे संस्कारांचे शिल्पकार असून त्यांच्या अनुभवातून पुढील पिढीला शिकण्याची मोठी संधी मिळते. कुटुंबसंस्था सुदृढ आणि सुसंवादी ठेवण्यासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन ही काळाची गरज आहे,” असेही प्रा. कलशेट्टी यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत  रमणशेट्टी होते. यावेळी शिवलिंगप्पा शहाबादे, प्रकाश बिराजदार, राजशेखर नागशेट्टी, नागनाथ बाळशेट्टी यांच्यासह संघाचे पदाधिकारी, संचालक, संचालिका आणि सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबुराव नरूणे यांनी केले. सूत्रसंचालन संघाचे सचिव सुनील पुजारी यांनी केले, तर आभार भीमराव गंगधरे यांनी मानले. महिला सभासदांसह संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्येष्ठांच्या अनुभवाला, विचारांना आणि सामाजिक योगदानाला उजाळा देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top