ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे!
गाळप हंगामापूर्वी उपाययोजनांची मागणी; तुळजाभवानी कामगार संघटनेचे निवेदन
धाराशिव, दि. १३ ऑक्टोंबर :
ऊसतोड कामगार, मुकादम, ऊस वाहतूकदार, हार्वेस्टर चालक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी गाळप हंगामापूर्वी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तुळजाभवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ऊसतोड कामगारांना स्थलांतराच्या काळात आरोग्य, निवास आणि मूलभूत सुविधांअभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे साखर कारखान्यांच्या परिसरात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह प्रत्येक कारखान्यावर आरोग्य अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कामगारांची नोंदणी व ओळखपत्रे, महिला कामगारांची आरोग्य तपासणी, जनावरांसाठी पशुवैद्यकीय सेवा, कामगारांच्या मुलांसाठी आवश्यक सुविधा आणि रेशनधान्याचे वाटप सुनिश्चित करावे. तसेच ऊस वाहतूकदार व उत्पादकांची बिले वेळेत अदा करावीत आणि मुकादम-वाहतूकदारांच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
गाव, तांडा, वाडी-वस्ती स्तरावर नोंदणी शिबिरे घेऊन कामगारांच्या याद्यांची पडताळणी करावी. गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन संघटनेने केले आहे. निवेदनाच्या प्रती संबंधित मंत्री, साखर आयुक्त आणि कामगार कल्याण यंत्रणांनाही पाठविण्यात आल्या आहेत.