२५ वर्षांनंतर मित्र-गुरुजनांची पुन्हा भेट; जुन्या आठवणींना उजाळा; जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या २००१ सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

नळदुर्ग, दि. ५ ऑक्टोंबर :

शाळेचे दिवस संपल्यानंतर तब्बल २५ वर्षांचा कालावधी लोटला; मात्र मैत्रीच्या आठवणींची वीण आजही तितकीच घट्ट असल्याचे भावनिक चित्र नळदुर्ग येथे पाहायला मिळाले. जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या २००१ सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी (दि. ४) जुन्या शाळेच्या इमारतीतील मरिआईच्या मैदानावर उत्साहात पार पडला. या निमित्ताने माजी विद्यार्थी आणि गुरुजन एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा देत मनमुराद गप्पांचा फड रंगला.

तब्बल अडीच दशकांनंतर अनेक मित्र एकमेकांना भेटल्याने वातावरण भावूक झाले होते. शाळेतील खोड्या, वर्गातील गंमती-जमती, मित्रांची मैत्री आणि गुरुजनांनी दिलेले संस्कार यांचा आठवणींचा पट यावेळी उलगडला. अनेक वर्षांनंतर भेटलेल्या मित्रांनी एकमेकांची आस्थेने विचारपूस करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

या स्नेहमेळाव्यास शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक श्रीकांत जाधव, बालाजी कुसुमकर, अभय रेणके, भागोजी घुगे, सुहास कंदले, नामदेव सुरवसे, प्रकाश बशेट्टी तसेच विद्यमान मुख्याध्यापक निजाम इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी माजी विद्यार्थी शिरीष कुलकर्णी, हणमंत गायकवाड, मुहम्मद इनामदार, शाहेद बागवान, सलीम शेख, प्रवीण बनसोडे, बाबासाहेब पासोडे, किरण गायकवाड, सुतार मुजाहेद, सागर बशेट्टी, संभाजी कांबळे, चंद्रकांत बुट्टे, मोसीन इनामदार, राहुल बनसोडे, शिवाजी वाघमारे, अण्णा सोनवणे, इब्राहीम पठाण, लक्ष्मीकांत घोडके, सुनील कसेकर, माजिद शेख, विपुल दुपारगुडे, नागनाथ फिसके, असलम शेख, धनंजय वाघमारे, भीमाशंकर कलशेट्टी आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

स्नेहमेळाव्यात गुरुजनांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळेतील जुन्या आठवणी सांगितल्या. तसेच गुरुजनांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी जीवनात केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांमधून इब्राहीम पठाण, हणमंत गायकवाड, शिरीष कुलकर्णी, बाबासाहेब पासोडे आणि मोसीन इनामदार यांनीही मनोगत व्यक्त करून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.

शिक्षकांनी दिलेले संस्कार आणि शाळेने दिलेली मैत्रीची नाती आयुष्यभराची शिदोरी ठरतात, अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरीष कुलकर्णी यांनी केले. हणमंत गायकवाड यांनी प्रास्ताविक केले, तर सुतार मुजाहेद यांनी आभार मानले. स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने  वर्गमित्रांची मैत्री पुन्हा एकदा नव्याने फुलली.



 
Top