सण-उत्सवांत वीज गायब; सकल हिंदू समाजाचा महावितरणला जाब! नळदुर्गमध्ये अखंडित वीजपुरवठ्याची मागणी; वसंतनगरच्या जगदंबादेवी मंदिरातील चोरीच्या घटनेने चिंता
नळदुर्ग, दि. १४ ऑक्टोंबर:
नळदुर्ग शहरात हिंदूंच्या सण-उत्सवांच्या काळात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारीवरून सकल हिंदू समाजाने महावितरणकडे धाव घेतली आहे. सणांच्या काळातच वीजपुरवठा का खंडित होतो, असा सवाल उपस्थित करत अनावश्यक लोडशेडिंग तातडीने बंद करून शहरात अखंडित व सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सकल हिंदू समाजाच्या वतीने बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी महावितरणच्या नळदुर्ग येथील सहाय्यक अभियंत्यांना हे निवेदन देण्यात आले. शहरातील नागरिक, भाविक, व्यापारी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांना वारंवार वीज खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
धार्मिक कार्यक्रमांत अडथळे; नागरिकांकडून सवाल
सण-उत्सवांच्या काळात मंदिरांमध्ये आरती, भजन, कीर्तन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सार्वजनिक मंडळांचेही विविध उपक्रम सुरू असतात. मात्र, अशा वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने कार्यक्रमांमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे हिंदूंच्या सणांच्या वेळी जाणीवपूर्वक लोडशेडिंग केले जात आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात असल्याचे समाजाने निवेदनात म्हटले आहे.
ईदसह अन्य धर्मांच्या सणांच्या काळात आणि हिंदूंच्या सणांच्या वेळी वीज पुरवठ्याबाबत समान निकष लागू केले जातात का, याबाबतही महावितरणने स्पष्टता द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कोणत्याही धर्माच्या सण-उत्सवांत भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा, अशी भूमिका सकल हिंदू समाजाने मांडली आहे.
जगदंबादेवी मंदिरातील चोरीमुळे चिंता
दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्याच्या पार्श्वभूमीवर वसंतनगर येथील जगदंबादेवी मंदिरात मंगळवारी सायंकाळी चोरीची घटना घडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडित होणे आणि मंदिरातील चोरीची घटना यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
महावितरणकडे पाच प्रमुख मागण्या
सण-उत्सवांच्या काळात अनावश्यक लोडशेडिंग तातडीने बंद करावे, नळदुर्ग शहरात अखंडित वीजपुरवठा करावा, लोड शेडिंग होत असल्यास त्याची कारणे, वेळापत्रक आणि संबंधित आदेश नागरिकांना कळवावेत, सर्व धर्मांच्या सणांच्या वेळी समान निकष लागू करावेत, तसेच निवेदनावर केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
या निवेदनाची तातडीने दखल घेऊन योग्य ती चौकशी करावी आणि नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती सकल हिंदू समाजाने केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास नागरिकांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी सकल हिंदू समाजाचे गणेश मोरडे, विजय ठाकूर, रवी सुरवसे , काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक मारुती खारवे, नगरसेवक सुधीर पोतदार, आकाश कुलकर्णी, पत्रकार विलास येडगे आदी उपस्थित होते.