अतिक्रमणांमुळे नळदुर्गकरांचा जीव टांगणीला; सकल हिंदू समाजाचे आज नगरपरिषदेसमोर उपोषण!
पाच महिन्यांपासून निवेदने देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष


नळदुर्ग ,दि.३ नोव्हेंबर :

 शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि बेशिस्त वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्यांना दररोज त्रास सहन करावा लागत असतानाही नगरपरिषद प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून तक्रारी, निवेदने देऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने सकल हिंदू समाजाच्या वतीने आज, मंगळवार (दि. ३) रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर शांततामय उपोषण करण्यात येणार आहे.

शहरातील अक्कलकोट रोड, बसस्थानकासमोरील परिसर आणि शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. मच्छी विक्रेते, फळ विक्रेते, हातगाड्या,  वाहने तसेच व्यापाऱ्यांचे रस्त्यावरील साहित्य यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यातच दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहने अस्ताव्यस्त उभी केली जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा नित्याचाच झाला आहे.

या कोंडीमुळे एसटी बस, रुग्णवाहिका आणि शालेय वाहनांनाही मार्ग काढताना अडचणी येतात. पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून जावे लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल हिंदू समाजाने २८ ऑक्टोंबर रोजी पोलीस ठाणे व नगरपरिषद प्रशासनासह संबंधिताना निवेदन दिले होते. 

अद्याप अतिक्रमण हटविण्याबाबत ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने पोलीस ठाण्यासमोरील नियोजित उपोषण रद्द करून आंदोलनाचे ठिकाण बदलण्यात आले आहे. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे.

अतिक्रमणे तातडीने हटवावीत, रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करावेत, बेकायदेशीर वाहनतळावर दंडात्मक कारवाई करावी तसेच बसस्थानक परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू करून किमान दोन पोलीस कर्मचारी नियुक्त करावेत, अशा प्रमुख मागण्या सकल हिंदू समाजाने केल्या आहेत.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top