उजनीतून धाराशिवला मिळणार १ टीएमसी पाणी, पुढील आवर्तनात पाणी सोडण्यास जलसंपदामंत्र्यांची मंजुरी; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
धाराशिव, दि. ६ नोव्हेंबर :
जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी उजनी धरणातून धाराशिव जिल्ह्याला एक टीएमसी पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला मान्यता दिल्यानंतर आता जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही पुढील आवर्तनात एक टीएमसी पाणी सोडण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. घाटणे बॅरेजमार्गे हे पाणी जिल्ह्यात आणले जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उजनी धरणातून एक टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. हे पाणी घाटणे बॅरेजमधून रामदरा, पांगरदरवाडी आणि सिंदफळ येथील तलावांमध्ये सोडण्याबाबत रीतसर प्रस्तावही सादर करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेत आवश्यक कार्यवाहीस मान्यता दिली होती.
त्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आमदार पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. संबंधित प्रस्ताव कृष्णा-मराठवाडा पाटबंधारे मंडळाकडे पाठविण्यात आला. मंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर तो अंतिम मान्यतेसाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सादर करण्यात आला. आमदार पाटील यांनी मंत्र्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पुढील आवर्तनात एक टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिव दौऱ्यावर आले असताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उजनीतून एक टीएमसी पाणी आरक्षित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना पाणी आरक्षित करण्याबाबत निर्देश दिले होते. तसेच कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निर्णयांमुळे प्रकल्पाच्या कामांना गती मिळाली असून उजनीचे पाणी धाराशिव जिल्ह्यात आणण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या धाराशिव जिल्ह्यासाठी उजनीचे एक टीएमसी पाणी उपलब्ध होणे ही दिलासादायक बाब मानली जात आहे.