यश इंडस्ट्रीजमध्ये उद्या भव्य रोजगार मेळावा; दहावी, बारावी व आयटीआय उत्तीर्णांना नोकरीची संधी!

सीएनसी/व्हीएमसी मशीन ऑपरेटर पदासाठी थेट मुलाखती; २० हजार रुपये मासिक वेतनासह मोफत निवास व बस सुविधा

नळदुर्ग, दि. १८ नोव्हेंबर:

नळदुर्ग व तुळजापूर तालुक्यातील बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. यश इंडस्ट्रीजच्या वतीने गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी नळदुर्ग येथील श्री अंबाबाई मंदिर देवस्थान परिसरात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची  माहिती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष अँड अरविंद बेडगे यांनी सांगितले.

 तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटी आणि अ‍ॅड. अरविंद बेडगे मित्रमंडळ यांच्या पुढाकारातून हा मेळावा आयोजित करण्यात आला असून, दहावी, बारावी तसेच आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी मिळणार आहे.
या रोजगार मेळाव्यात यश इंडस्ट्रीजमध्ये सीएनसी (CNC) व व्हीएमसी (VMC) मशीन ऑपरेटर या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहिना २० हजार रुपये वेतन देण्यात येणार असून, २६ दिवसांच्या कामकाजासाठी हे वेतन निश्चित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, नोकरीच्या ठिकाणी राहण्याची मोफत व्यवस्था, ये-जा करण्यासाठी मोफत बस सुविधा, अप्रेंटिसशिपचा लाभ तसेच कॅन्टीनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील अनेक तरुण शिक्षण पूर्ण करूनही रोजगाराच्या शोधात आहेत. औद्योगिक क्षेत्रातील नोकरीच्या संधींची माहिती नसल्याने अनेकांना योग्य रोजगार मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक तरुणांना औद्योगिक क्षेत्रात रोजगाराची संधी मिळावी, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नळदुर्गसह तुळजापूर तालुका आणि परिसरातील बेरोजगार तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
थेट मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे
या मेळाव्यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण, बारावी उत्तीर्ण किंवा आयटीआय अशी आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा, आधारकार्ड, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत मुलाखती पार पडणार आहेत.

अ‍ॅड. अरविंद बेडगे हे तुळजापूर तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असून, त्यांच्या पुढाकाराने आणि मित्रमंडळाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यश इंडस्ट्रीजचा मनुष्यबळ विभाग आणि आयोजकांच्या संयुक्त प्रयत्नातून स्थानिक बेरोजगारांना रोजगाराची दारे खुली करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अधिक माहितीसाठी स्वामी अप्पी (९७६४६६८६९९), अंबादास पवार (९८३४६५८७०७), राजू सुरते (९८२२२५३७९०) आणि अ‍ॅड. अरविंद बेडगे (९६७३०४७५०१) यांच्याशी संपर्क साधावा.

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी केवळ रोजगाराच्या प्रतीक्षेत न राहता या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.