नळदुर्ग शहरात बुधवार पासुन शिवलिंगेश्वर महाराजांचा पुण्यस्मरणोत्सवास प्रारंभ,
सात दिवस धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी; १ डिसेंबरला पुण्यस्मरण सोहळा व धर्मसभा
नळदुर्ग, दि. २४ नोव्हेंबर :
येथील राजगुरू शिवलिंगेश्वर हिरेमठाचे निर्विकल्प समाधिस्थ राजगुरू श्रीष.ब्र. १०८ शिवलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचा पुण्यस्मरणोत्सव सोहळा व धर्मसभा २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, शिवपुराण कथा तसेच विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२५ ते ३० नोव्हेंबरदरम्यान दररोज सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत मठाधिपती श्रीष.ब्र. बसवराज शिवाचार्य महास्वामीजी यांचे प्रवचन होणार आहे. या प्रवचनातून भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन लाभणार आहे.
३० नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता भजन व जागरणाचा कार्यक्रम होईल. तर १ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता महारुद्राभिषेक व दीक्षा अय्याचार विधी पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता मुख्य पुण्यस्मरणोत्सव सोहळा व धर्मसभा होणार आहे.
या सोहळ्यास विविध मठांचे महास्वामीजी, आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, भाजपचे मराठवाडा संयोजक नितीन काळे, नळदुर्गचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सात दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यासाठी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून अल्पोपहार व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. मठाचे भक्त, शिष्यगण आणि परिसरातील भाविकांनी या पुण्यस्मरणोत्सव सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मठाधिपती श्रीष.ब्र. बसवराज शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले आहे.