आंबेडकरी चळवळीचा लढवय्या पँथर काळाच्या पडद्याआड!
तानाजी कदम यांच्या कुटुंबीयांना केंद्रीय मंत्री रामदास आठवलेनी  भेट देत केले सांत्वन


नळदुर्ग, दि. २५ नोव्हेंबर :

  दलित पँथरच्या स्थापनेपासून ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वाटचालीपर्यंत आंबेडकरी चळवळीत निष्ठेने योगदान देणारे तुळजापूर येथील  कार्यकर्ते तानाजी देवाप्पा कदम यांचे अल्पशा आजाराने २१ नोव्हेंबर  रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील एक लढवय्या कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला असून रिपब्लिकन चळवळीची मोठी हानी झाली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कदम यांनी अनेक वर्षे पक्षाचे काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केले. पक्षसंघटनेच्या माध्यमातून आंबेडकरी विचारधारा आणि चळवळीशी त्यांची बांधिलकी कायम राहिली.
२२ नोव्हेंबर रोजी तुळजापूर येथील मोतीझरा स्मशानभूमीत बौद्ध धम्म संस्कारानुसार त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश जॉइंट सेक्रेटरी राजाभाऊ ओव्हाळ यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी कदम यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

दरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी तुळजापूर येथे कदम यांच्या निवासस्थानी भेट देऊन शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले. या भेटीप्रसंगी  राजाभाऊ ओव्हाळ, जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे, एस के ‌ गायकवाड यांच्यासह रिपाइंचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तानाजी कदम यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.