महामार्ग भूसंपादनावरून शेतकरी आक्रमक; १० डिसेंबरला नळदुर्ग अपर तहसिलसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा
नळदुर्ग,दि.२८ नोव्हेंबर :
नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेत बाधित शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करीत शेतकरी संघर्ष समितीने प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानुसार प्रसिद्ध करण्यात आलेली ३- अ अधिसूचना जाणीवपूर्वक व्यपगत करण्यात आल्याचा आरोप समितीने केला आहे.
याप्रकरणी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी ओंकार देशमुख यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी, जिल्हाध्यक्ष सरदारसिंग ठाकूर, तुळजापूर तालुकाध्यक्ष व्यंकट पाटील, महेश घोडके यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिका-याकडे निवेदन सादर केले.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५२ अंतर्गत नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्याच्या भूसंपादनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार ३-अ अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, संबंधित अधिसूचना जाणीवपूर्वक व्यपगत करण्यात आल्याचा आरोप समितीने केला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी ओंकार देशमुख यांनी कर्तव्यात कसूर करून न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भूसंपादन प्रक्रियेत बाधित शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा येत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर तातडीने प्रशासकीय कारवाई करावी, तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करून बाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी समितीने केली आहे.
१० डिसेंबरला ठिय्या आंदोलन
दरम्यान, प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन कारवाई न केल्यास गुरुवार, दि. १० डिसेंबर २०२६ रोजी नळदुर्ग येथील अपर तहसील कार्यालयासमोर सर्व बाधित शेतकऱ्यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे. त्यामुळे महामार्ग भूसंपादनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे बाधित शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.