संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे सामूहिक वाचन; २६/११ च्या शहीदांना श्रद्धांजली
मुरूम, दि. २६ नोव्हेंबर :
भारतीय संविधान दिन आणि मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील निष्पाप नागरिकांसह वीरमरण आलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी श्रमजीवी अध्यापक महाविद्यालय, उमरगा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय सरपे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मुंबई हल्ल्यातील शहीदांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचनही करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. विजय सरपे यांनी आपल्या संदेशातून प्रा. अमोल इंगळे यांच्या माध्यमातून भारतीय संविधानाचा मूळ उद्देश, त्यातील मूल्ये आणि लोकशाही व्यवस्थेतील संविधानाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. संविधानाने दिलेली समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये प्रत्येकाने आपल्या आचरणात आणण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रा. डॉ. कदम प्रवीणकुमार, प्रा. चव्हाण देविदास, प्रा. पवार भाऊ, प्रा. तेजस्विनी करंडे, प्रा. इंगळे अमोल, मोरे विजय, दुर्गे माधव, आदित्य सूर्यवंशी, सुरवसे दगडू यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.