शेजाऱ्यांच्या वादातून कुटुंबावर हल्ला; पती-पत्नी, आईला मारहाण,
खुदावाडीत लोखंडी रॉड, फरशीने वार; तिघांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल
नळदुर्ग,दि.२५ नोव्हेंबर :
घराशेजारी पेटविलेल्या शेकोटीच्या कारणावरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथे घडली. शेजारी राहणाऱ्या तिघांनी घरात घुसून लोखंडी रॉड, फरशी आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत पती, पत्नी आणि आई जखमी झाल्याची तक्रार नळदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
राहुल दत्तात्रय डोंगरे (वय ३१, रा. खुदावाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घराशेजारी जिदावली नवाज शेख, सद्दाम शेख आणि आयुब शेख राहतात. २३ नोव्हेंबर रोजी रात्री शेजारील घरासमोर कागद व प्लास्टिक जाळून शेकोटी पेटविण्यात आली होती. त्यातून आगीची ठिणगी घराच्या पत्र्यावर पडल्याने पत्नी सविता यांनी पाणी टाकून आग विझवली. याच कारणावरून शेजाऱ्यांनी वाद घालत शिवीगाळ व धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसऱ्या दिवशी, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास तिघांनी डोंगरे यांच्या घरासमोर येऊन वाद घातला. यावेळी जिदावली नवाज शेख याने लोखंडी रॉडने डोक्यात व पाठीवर मारहाण केली, तर सद्दाम शेख याने फरशीने डोक्यात व हातावर वार केले. आयुब शेख यानेही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पत्नी सविता आणि आई पार्वती यांनाही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचेही सांगण्यात आले आहे.
ॲट्रॉसिटी कायद्यान्वयेही कारवाई
याप्रकरणी मंगळवार दि.२४ नोव्हेंबर रोजी रात्री नळदुर्ग पोलीस ठाण्यात नोंद गुन्हा करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ मधील कलम ३(१)(आर) व ३(१)(एस) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील हे करीत आहेत.
दरम्यान नळदुर्ग येथील हिंदू समाज खाटिक यांच्या वतीने जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश पिस्के , श्रीकांत रांजनकर, शिवाजी कनकधर, रवी पिस्के, शाम कनकधर , यानी या हल्ल्याचा निषेध करत आरोपी विरुद्ध कठोर कारवाई ची मागणी केली आहे.