संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन; बौद्ध धम्म पद्धतीने सागर-निशाचा मंगल परिणय!

संविधान दिनाचे औचित्य साधत नळदुर्ग येथे अनोखा विवाह सोहळा; सामाजिक परिवर्तनाचा दिला संदेश

नळदुर्ग, दि. २८ नोव्हेंबर  : एस.के. गायकवाड 

भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधत संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून बौद्ध धम्म पद्धतीने सागर गवळी आणि निशा गायकवाड यांचा मंगल परिणय सोहळा उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. विवाह सोहळ्यात संविधानाला वंदन करून नवदाम्पत्याने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. या अनोख्या उपक्रमातून सामाजिक समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा जागर करण्यात आला.

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान सभेने संविधानाचा स्वीकार केला. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ देशभरात संविधान दिन साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून गवळी आणि गायकवाड परिवाराने विवाह सोहळ्याचे आयोजन केल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
विवाहाच्या धम्मसंस्कार विधीला सुरुवात करण्यापूर्वी विधीकर्ते एस. के. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित ग्रामस्थ, महिला, युवक आणि मान्यवरांनी सामूहिकरीत्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. त्यानंतर बौद्ध धम्म पद्धतीने विवाह विधी पार पडला. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा प्रत्यक्ष जीवनात अंगीकार करण्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला.

सामान्यतः विवाह सोहळे पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात; मात्र संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून विवाहबंधनात अडकण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला. केवळ विवाहाचा आनंदोत्सव न साजरा करता संविधानाप्रती कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी व्यक्त करण्याचा एक वेगळा आदर्श या कुटुंबांनी निर्माण केला आहे.