सौरऊर्जा कंपनीच्या अतिक्रमणाविरोधात शेतकऱ्याचा एल्गार!
१५ दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा जेसीबी लावून अतिक्रमण हटविण्याचा इशारा!

नळदुर्ग, दि. २२ नोव्हेंबर:

तुळजापूर तालुक्यातील दहिवडी येथे सौरऊर्जा प्रकल्पाशी संबंधित कंपनीने शेतजमिनीवर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप एका शेतकऱ्याने केला आहे. गट क्रमांक १४३ मधील मालकीच्या जमिनीवरील कथित अतिक्रमण हटविण्यासाठी शेतकरी शिवशंकर हनुमंत गाटे यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. संबंधित कंपनीने १५ दिवसांत अतिक्रमण हटवावे, अन्यथा जेसीबीच्या सहाय्याने ते हटविण्याची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. या तक्रारीमुळे परिसरात जमीन हक्काचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दहिवडी येथील गट क्रमांक १४३ मधील ३ हेक्टर ९६ आर क्षेत्राची जमीन आपल्या मालकीची असून, त्यावर आपला ताबा व वहिवाट असल्याचे गाटे यांनी तक्रारीत म्हटले आहे. इमर्जिकावर्ल्ड एंटरटेनमेंट लिमिटेड या सौरऊर्जा कंपनीने या जमिनीमध्ये बेकायदेशीररीत्या अतिक्रमण केल्याचा त्यांचा आरोप आहे.

मोजणी झाली, तरी अतिक्रमण कायम असल्याचा दावा
संबंधित जमिनीची अधिकृत मोजणी होऊनही कथित अतिक्रमण हटविण्यात आले नसल्याचे गाटे यांचे म्हणणे आहे. यापूर्वीही संबंधित कार्यालयांकडे वारंवार अर्ज व तक्रारी करून अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झाली नसल्याने त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.

१५ दिवसांची मुदत; जेसीबी लावण्याचा इशारा
या प्रकरणी धाराशिव येथील उपविभागीय अधिकारी आणि भूमी अभिलेख कार्यालयाकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. संबंधित कंपनीला १५ दिवसांच्या आत अतिक्रमण हटविण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत कार्यवाही न झाल्यास जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटविण्यात येईल. या कारवाईसाठी येणारा संपूर्ण खर्च संबंधित कंपनीकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणीही शेतकऱ्याने केली आहे.
संभाव्य कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनाही निवेदन
या तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी धाराशिव, पोलीस अधीक्षक धाराशिव आणि तामलवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता महसूल, भूमी अभिलेख आणि पोलीस प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

शेतजमिनीच्या हद्दीचा वाद प्रशासन कधी सोडविणार?
सौरऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून विकासाची कामे होत असताना शेतकऱ्यांच्या खासगी मालकीच्या जमिनींच्या हक्कांवर गदा येत असल्याच्या तक्रारी गंभीर मानल्या जात आहेत. संबंधित जमिनीची मोजणी, नकाशे, हद्दीचे अभिलेख आणि प्रत्यक्ष ताब्याची स्थिती यांची महसूल व भूमी अभिलेख विभागाने संयुक्तपणे तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक आहे.

कंपनीकडून खरोखरच अतिक्रमण झाले आहे का, याची निष्पक्ष चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एका बाजूला शेतकऱ्याचा जमीन हक्काचा दावा, तर दुसऱ्या बाजूला सौरऊर्जा कंपनीचा प्रकल्प अशा परिस्थितीत प्रशासनाच्या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. शेतकऱ्याला न्याय मिळणार की हा वाद आणखी चिघळणार, याकडे दहिवडीसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.