आलियाबाद पुलाखाली पुन्हा मगरीचे दर्शन; बोरी नदीकाठी सतर्कतेचा इशारा!
नदीपात्रात उतरण्यास मनाई; नागरिकांनी जीव धोक्यात घालू नये, तहसीलदार प्रमोद गायकवाड यांचे आवाहन

नळदुर्ग, दि. २५ नोव्हेंबर : 

नळदुर्ग शहरालगत असलेल्या आलियाबाद पुलाखाली बोरी नदीपात्रात पुन्हा मगर आढळून आल्याने परिसरात सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नळदुर्ग अपर तहसील कार्यालयाने खबरदारीचा इशारा जारी केला असून, कोणत्याही कारणासाठी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी केले आहे.

बोरी नदी परिसरात शेतकरी, पशुपालक आणि ग्रामस्थांची विविध कामांसाठी नियमित वर्दळ असते. जनावरांना पाणी पाजणे, शेतीची कामे तसेच नदीकाठच्या परिसरात जाण्याचे प्रकार घडतात. याशिवाय नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी येणारे पर्यटकही नदी परिसरात फिरत असतात. अशा परिस्थितीत नदीपात्रात मगरीचे अस्तित्व आढळल्याने नागरिकांसह जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मगरीला जवळून पाहण्याच्या उत्सुकतेपोटी नदीकाठी गर्दी करणे, फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी पाण्याजवळ जाणे, असे धोकादायक प्रकार टाळावेत. जनावरांना पाणी पाजण्यासाठी नदीपात्रात नेऊ नये. लहान मुलांना नदीकाठी खेळण्यास मनाई करावी. नागरिकांनी नदी परिसरात अनावश्यक गर्दी न करता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मगर दिसल्यास तातडीने कळवा!
नदीपात्रात मगर आढळल्यास तिच्याजवळ जाण्याचा किंवा तिला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये. याबाबत तातडीने तहसील कार्यालयाला माहिती द्यावी. नागरिकांनी स्वतःची, कुटुंबीयांची आणि जनावरांची सुरक्षितता लक्षात घेऊन कोणतेही धाडस करू नये. प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून सहकार्य करावे, असे तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
संपर्क : ८३२९५३५८४९ — प्रमोद गायकवाड, तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, अपर तहसील कार्यालय, नळदुर्ग.