किनगाव पोलीस ठाण्यात तरुणाच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करा!
मंत्री संजय राठोड यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; दोषी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी
मुंबई, दि. २८ नोव्हेंबर :
लातूर जिल्ह्यातील किनगाव पोलीस ठाण्यात २१ वर्षीय अमित रमेश चव्हाण या तरुणाचा पोलीस कोठडीत झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मरशिवनी तांडा (ता. अहमदपूर) येथील अमित चव्हाण हा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला असून, पोलिसांनी नियोजनबद्ध हत्या केल्याचा गंभीर आरोप त्याच्या आई-वडिलांसह नातेवाइकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणाकडे लक्ष वेधले.
निवेदनातील माहितीनुसार, अमित आणि त्याची मैत्रीण २० नोव्हेंबर रोजी घरातून निघून गेले होते. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी २१ नोव्हेंबर रोजी किनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अहिल्यानगर रेल्वे स्थानकावरून दोघांना ताब्यात घेतले. मुलीने आपण स्वेच्छेने आल्याचा जबाब दिल्याची माहिती आहे. त्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता दोघांना किनगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
दरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता पोलिसांनी अमितच्या वडिलांना फोन करून अमितने गळफास घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, पोलीस ठाण्यात घडलेल्या या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला असून, संपूर्ण घटनेची सत्यता समोर येण्याची मागणी केली आहे.
या घटनेकडे प्रेमप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पाहताना त्याला जातीच्या चष्म्यातून पाहू नये, असेही मंत्री संजय राठोड यांनी निवेदनात नमूद केले आहे. अमितच्या मृत्यूमागील नेमके सत्य उजेडात आणण्यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करावी, दोषी आढळणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.