ठेसा, झुणका-भाकर खात शेतकऱ्यांचा रास्ता रोको!
बैलगाड्या-बैलजोड्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; ‘पाच हजारांत दिवाळी कशी साजरी करायची?’ रवींद्र इंगळे यांचा सरकारला सवाल

तुळजापूर, दि. ७ नोव्हेंबर: 

दिवाळीच्या सणात सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना दुष्काळाच्या संकटाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांच्या वाट्याला मात्र संघर्ष आला आहे. शासनाकडून मिळणारी तुटपुंजी मदत आणि शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारी तुळजापुरात अनोखे रास्ता रोको आंदोलन केले. जुन्या बसस्थानकासमोरील चौकात ठेसा, झुणका-भाकर खात, बैलगाड्या आणि बैलजोड्यांसह शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेत शासनाचे लक्ष वेधले.

या आंदोलनात संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी माझ्या आया-बहिणींना विचारावे की पाच हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी करायची? याचे उत्तर सरकारनेच द्यावे. मंत्री आणि आमदारांचे काही दिवसांचे वेतन कापले, तर मोठा निधी उभा राहू शकतो. हा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देऊन त्यांनाही सन्मानाने दिवाळी साजरी करण्याची संधी द्यावी."
सरकारकडून केवळ घोषणा केल्या जात असून शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर ठोस निर्णय घेतले जात नाहीत. आश्वासनांच्या पलीकडे सरकारची भूमिका दिसत नाही. मराठवाड्यातील शेतकरी आपल्या हक्कांसाठी संघटित होऊन आवाज का उठवत नाहीत? असा सवालही इंगळे यांनी उपस्थित केला.

देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला अद्याप खरे स्वातंत्र्य मिळालेले नाही. एका दाण्याचे हजार दाणे निर्माण करणारा शेतकरी आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. विशेष म्हणजे आता शेतकरी महिलाही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याची परिस्थिती चिंताजनक आहे, असे ते म्हणाले.

गोकुळ दूध संघावर सत्ता मिळविण्यासाठी राजकीय नेते प्रयत्नांची पराकाष्ठा करतात; मात्र शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी कायदा करण्याची वेळ येते, तेव्हा सरकारची भूमिका बदलते, अशी टीका त्यांनी केली. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ७५ हजार रुपयांचा पीकविमा मिळवून देण्यासाठी संघटना तीव्र संघर्ष करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

१२ मागण्यांचे निवेदन
आंदोलनानंतर शेतकऱ्यांच्या विविध १२ मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार काळे यांना देण्यात आले. या मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मंडळ अधिकारी अमर गांधले आणि शहर तलाठी शरद दुधभाते उपस्थित होते.
या आंदोलनात रवींद्र इंगळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरपरिषदेचे गटनेते अमोल कुतवळ, धनाजी पेंदे, तानाजी पाटील, विष्णुदास काळे, दुर्वास भोजने, प्रवीण कदम, सचिन कदम, रामेश्वर नेटके, शहाजी सोमवंशी, कल्याण भोसले, ईश्वर गायकवाड, बापू धुमाळ, विजय सिरसाट यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, ज्येष्ठ शेतकरी आणि महिला शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दिवाळीच्या सणातही शेतकऱ्यांना आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याने या आंदोलनातून ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी पुन्हा एकदा समोर आली आहे.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Recent News

 
Top