सांगोला (राजेंद्र यादव) -: टेंभू उपसा जलसिंचन योजनेची कामे 28 एप्रिल पर्यंत सुरु झाली नाहीत तर 29 एप्रिल पासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आटपाडी व सांगोला तालुक्यातील शेतकरी, कार्यकर्ते ठिय्या धरणे आंदोलन करतील असा इशारा आमदार गणपतराव देशमुख यांनी सरकारला दिला. 
    सांगोला तालुक्यातील शेतकर्‍यांनी आमदार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली टेंभू येथे भेट देवून योजनेची सद्य वस्तूस्थिती जाणून घेतली. यावेळी जि.म.सह.बँकेचे संचालक चंद्रकांत देशमुख, सूतगिरणीचे चेअरमन नानासाहेब लिगाडे, माजी नगराध्यक्ष मारुतीआबा बनकर उपस्थित होते. 
     दि. 14 एप्रिल रोजी टेंभू (कराड) येथे शेकापक्ष कार्यकर्त्यांसमोर बोलताना आमदार गणपतराव देशमुख म्हणाले की, आम्ही दुष्काळात जन्मलो असलो तरी दुष्काळात मरणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. आम्हीही पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी संघर्षासाठी तयार आहोत. पाणी मिळाल्याशिवाय आता मागे हटणार नाही. राज्याच्या अर्थसंकल्पात टेंभू प्रकल्पासाठी 79 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सरकारने फक्त 6 कोटी रुपये दिले. मुख्यमंत्री ना. चव्हाण आटपाडी येथे जानेवारीमध्ये आले होते त्यावेळी 73 कोटी टेंभूसाठी दिल्याची घोषणा केली. घोषणा केल्यानंतर सुमारे सव्वा महिन्यानंतर सदरचा निधी टेंभू प्रकल्पाकडे वर्ग झाला परंतु अद्यापही कामे सुरु झालेली नाहीत. जलसंपदामंत्री ना. तटकरे व कृष्णा खोरे मंत्री ना. रामराजे निंबाळकर यांचेशी टेंभूची कामे सुरु करण्यासंबंधी बैठका झाल्या. परंतु कामे अजूनही ठप्पच आहेत. यापूर्वी टेंभूचा निधी अन्यत्र वळविला होता. सन 2013-2014 राज्याच्या अर्थसंकल्पात टेंभूसाठी 152 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी 118 कोटी सांगली जिल्ह्यासाठी, 25 कोटी सोलापूर जिल्ह्यासाठी आणि 9 कोटी रुपये सातारा जिल्हा टेंभू प्रकल्पावर खर्च करण्याचे नियोजन आहे. या निधीसाठी राज्यपालांनी मान्यता दिली आहे. आटपाडीत 40-50 कि.मी. परिसरात टँकर भरण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. टेंभूची कामे पूर्ण झाल्यास दुष्काळी भागास पिण्यासाठी पाणी मिळू शकते. जेथे शक्य आहे तेथे शेतीसाठी पाणीपुरवठा करावा. आम्ही कोणाचेही पाणी बंद करण्यासाठी आलो नाही. पाणी मिळावे यासाठी आमचा लढा आहे.
       यावेळी बोलताना डॉ. भारत पाटणकर म्हणाले, आटपाडीसाठी 73 कोटी रुपये मिळूनही अद्याप कामे सुरु झालेली नाहीत. पंपहाऊस, बोगद्यांची कामे त्वरेने आली पाहिजेत. टप्पा क्र. 1 व टप्पा क्र. 2 मध्ये 5-5 पंप वाढवण्याची गरज आहे. धरणग्रस्तांचे 10 जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरु आहे. दुष्काळी भागाच्या शेवटपर्यंत पाणी मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. याठिकाणी उपस्थित असणार्‍या टेंभू उपसाच्या संबंधित अधिकार्‍यांनी टेंभूची कामे लवकरच सुरु करु असे सांगितले. यावेळी पंचायत समिती सभापती ताई मिसाळ, उपसभापती पांडूरंग पांढरे, सूतगिरणीचे व्हा. चेअमरन सिध्देश्वर लोखंडे, महिला सूतगिरणीच्या अध्यक्षा विमलताई कुमठेकर, सुवर्णलता कारंडे, प्रभाकर चांदणे, मारुती लवटे, गजेंद्र कोळेकर, सुब्राव बंडगर, हणमंत बंडगर, बाळासाहेब एरंडे, गोविंद जाधव, नवनाथ पवार, जगदीश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top