उस्मानाबाद -: वादळी वा-यासह बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या उस्मानाबाद तालुक्यातील कोंड, नितळी, लासोना आणि घुगी या गावांना भेटी देऊन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी गावक-यांचे  म्हणणे जाणून घेतले. याठिकाणच्या नुकसानीचे तात्काळ पंचनाम्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
       उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागाला या अवकाळी पावसाचा फटका बसला होता. घरांची पडझड, फळबागांचे नुकसान, पशुधनाचे नुकसान अशा घटना काही भागात घडल्या होत्या. कोंड तसेच परिसरासही बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे या परिसरातील शेतीचे तसेच घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. घटनेची माहिती कळताच पालकमंत्री चव्हाण यांनी मुंबईहून तात्काळ जिल्हा प्रशासन, तहसील व कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कोंड व परिसरास भेटी देण्याचे निर्देश दिले होते. मुंबईहून परतल्यानंतर श्री. चव्हाण यांनी तातडीने या परिसराचा दौरा करुन पाहणी केली.
        पालकमंत्री चव्हाण यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली. पाणी टंचाईने हैराण झालेल्या या परिसरास कालच्या वादळी पावसानेही नुकसान पोहचविले आहे. प्रशासनास पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल,असे यावेळी त्यांनी सांगितले. पाणी टंचाईबाबतही  त्यांनी गावकऱ्यांकडून माहिती घेतली. रोजगार हमी योजनेची कामे मागणी करुन सुरु करुन घ्या. तसेच ग्रामसभेला याबाबतचे पूर्ण अधिकार आहेत. आपत्तीच्या काळात सर्वांनी एकत्रित येऊन मार्ग काढावा, असा सल्ला त्यांनी गावकऱ्यांना दिला.
        पालकमंत्री चव्हाण यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सदस्य अप्पासाहेब पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष  लक्ष्मण सरडे, विश्वास शिंदे, बाळासाहेब शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी  तसेच कृषी ,तहसील, पंचायत समिती आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
        कोंड गावातील पाहणी झाल्यानंतर पालकमंत्री चव्हाण यांनी लासोना, नितळी आणि घुगी आदि गावांनाही भेटी देऊन तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
 
Top