मुंबई : केंद्रसरकार अडचणीत असल्‍याने मध्‍यावधी निवडणुका होण्‍याची शक्‍यता गृहित धरुन कामाला लागा, कॉंग्रेसशी जुळवून घ्‍या, असा कानमंत्र राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी आपल्‍या कार्यकर्त्‍यांना दिला. आपापसातील गटतटाचे राजकारण बाजूला ठेवा आणि पक्षाचे जास्‍तीत जास्‍त खासदार दिल्‍लीत पाठवा, असे आवाहनही त्‍यांनी केले.
    राष्‍ट्रवादीकडील 22 लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिका-यांशी शनिवारी राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष तथा केंद्रीय कृषीमंत्री ना. शरद पवार यांनी चर्चा केली. यावेळी विधानसभा अध्‍यक्ष दिलीप वळसेपाटील, प्रदेशाध्‍यक्ष मधुकर पिचड, उपमुख्‍यमंत्री अजित पवार आदी नेते उपस्थित होते. गेल्‍या लोकसभा निवडणुकीत राष्‍ट्रवादीने 22 जागा लढवल्‍या होत्‍या. त्‍यापैकी केवळ आठ जागांवर विजय मिळाला. गमावलेल्‍या 14 जागा जिंकण्‍यासाठी काय करता येईल, याचा आढावा आज दिवसभर चाललेल्‍या बैठकीत पवार यांनी घेतला. ग्रामपंचायती, पंचायत समित्‍या आणि जिल्‍हा परिषदांच्‍या निवडणुकांचे निकाल लक्षात घेऊन लोकसभेसाठीचे जागा वाटप नव्‍याने करावे, अशी मागणी काही जिल्‍ह्यातील कार्यकर्त्‍यांनी केली. याचवेळी केंद्र सरकार सध्‍या अनेक अडचणीतून जात असून मध्‍यावधी निवडणुका होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे आपण सज्‍ज राहिले पाहिजे, असे पवार यावेळी म्‍हणाल्‍याचे समजते. लोकसभेसाठी आपण कॉंग्रेसच्‍याच साथीने जाणार असून त्‍यांच्‍याशी जूळवून घ्‍या, असेही पवार यांनी सांगितले. आपापसातील वादविवाद बाजूला ठेवून एकदिलाने निवडणुकीस सामोरे गेले पाहिजे, पक्षाचे लोकसभेतील संख्‍याबळ किमान 15-16 एवढे झाले पाहिजे, असे पवार यांनी वेगवेगळ्या जिल्‍ह्यातील कार्यकर्त्‍यांशी बोलताना सांगितले. उमेदवार तगडे असतील, तर जास्‍तीत जास्‍त जागा जिंकण्‍यात अडचणार येणार नाही, असे काही नेत्‍यांनी पवार यांनी सांगितले, तेव्‍हा पक्ष देईल, तो उमेदवार तुम्‍हाला जिंकू आणायचा आहे, असे त्‍यांनी सुनावल्‍याचे कळते.
 
Top