उस्‍मानाबाद -: बुधवारी रात्री जिल्‍ह्याच्‍या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. उस्‍मानाबाद तालुक्‍यातील कोंड येथे झालेल्‍या या वादळी पावसाने फळबागांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. याशिवाय घरांचीही मोठ्याप्रमाणात पडझड झाली. पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांनी तात्‍काळ जिल्‍हा प्रशासनाशी संपर्क साधून नुकसानीची पाहणी करुन पंचनामे करण्‍याचे आदेश दिले. त्‍यानुसार तहसिल कार्यालय, पंचायत समिती आणि कृषी कार्यालयाच्‍या प्रतिनिधींनी कोंड येथे गुरुवारी सकाळी जावून पाहणी केली.
    बुधवार रोजी जिल्‍ह्याच्‍या काही भागात जोरदार पाऊस झाला. वादळी वारे, वीजांचा कडकडाटासह पाऊस आल्‍याने कोंड येथे काही घरांवरील पत्रे उडाले. गावातील पोल्‍ट्री फार्मचेही नुकसान झाले. तसेच एक बैल मृत्‍यूमुखी पडला. फळबागांचेही विशेषता आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
    नुकसानीची माहिती मिळताच पालकमंत्री ना. चव्‍हाण यांनी जिल्‍हा प्रशासनाशी संपर्क साधून तात्‍काळ आवश्‍यक त्‍या उपाययोजना करण्‍याचे निर्देश दिले. शुक्रवार दि. 12 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता पालकमंत्री ना. चव्‍हाण कोंड येथे भेट देऊन देणार असल्‍याचे त्‍यांच्‍या कार्यालयाच्‍यावतीने कळविण्‍यात आले आहे.
    गुरुवार सकाळी तहसील, कृषी आणि पंचायत समितीच्‍या प्रति‍निधींनी कोंड येथे भेट देऊन पाहणी केली. सरपंच इमामबी मुलाणी, उपसरपंच उमाकांत भूमकर, तंटामुक्‍त समितीचे अध्‍यक्ष बालाजी पाटील, पंचायत समिती सदस्‍य रामेश्‍वर शेटे, नागनाथ पवार, राजाभाऊ पतंगे आदींनी या प्रतिनिधींना माहिती दिली.

 
Top