उस्मानाबाद :- जिल्ह्यातील वाशी आणि लोहारा तसेच लातूर जिल्ह्यातील औसा येथे अद्यावत बसस्थानकासाठी प्रशासकीय मंजूरी मिळाली असल्याचे  राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद  विभाग नियंत्रकांनी कळविले आहे. वाशी बसस्थानकासाठी 70 लाख 41 हजार 466 रुपये,लोहारा बसस्थानकासाठी 53 लाख 53 हजार 635 रुपये इतक्या रक्कमेस प्रशासकीय मंजूरी महामंडळाने दिली आहे. महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
       या दोन्ही बसस्थानकांमध्ये मुख्य इमारत, प्रसाधनगृह, बोअरवेल यासह इतर सुविधा  उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. वाशी येथील बसस्थानक कामाबाबत निविदाही प्रसिध्द करण्यात आले असून लोहारा येथील कामाबाबतही लवकरच  निवीदा काढण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. वाशी येथील बसस्थानकासाठी प्रशासकीय मंजूरी देण्यात आलेल्या रकमेपैकी 30 लाख रुपये आमदार राहून मोटे यांच्या स्थानिक विकास कार्यक्‌रम निधीतून,लोहारा बसस्थानकासाठी प्रशासकीय मंजूरी देण्यात आलेल्या रकमेपैकी 20 लाख इतका निधी आमदार सतिश चव्हाण, आमदार ज्ञानराज चौगुले आणि आ.विक्रम काळे यांच्या आमदार निधीतून  मिळणार आहे.
       राज्यात बसस्थानकाचे अद्यावतीकरण करण्याचे काम सुरु असून त्याचाच एक भाग म्हणून गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवाशांना दर्जेदार व सुरक्षित सेवा मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. औसा येथेही बांधा,वापरा व हस्तांतरण करा या तत्वावर अद्यावत बसस्थानक, व्यापारी संकुल बांधण्यात येणार आहे. 
 
Top