बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी-कूर्डुवाडी रस्‍त्‍यावर बुधवारी दुपारी तिरकस पुल ते उपळाई गावादरम्‍यान झालेल्‍या दुचाकी व सुमोच्‍या अपघातात एकाचा जागीच मृत्‍यू तर एकजण गंभीर जखमी झाल्‍याची घटना घडली. जखमीला रूग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की, विश्‍वास त्रिंबक शिंदे (वय 22), दिपक कुंडलिक भगाडे (वय 22) दोघे रा. लक्षाची वाडी, ता. बार्शी हे दोघे हिरो कंपनीच्‍या स्‍प्‍लेंडर क्र.बी.बी. 5350 या दुचाकीवरुन गावाकडे येत असताना पाठीमागून आलेल्‍या सुमो क्र. एम.एच 23 ई. 8628 या वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्‍याने विश्‍वास शिंदे याच्‍या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्‍याने त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला. तर दिपक भगाडे यास जखमी अवस्‍थेत येथील जगदाळे मामा रूग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे.
    अपघातानंतर सुमो चालकाने रस्‍त्‍याच्‍या कडेला असलेल्‍या खड्डयात वाहन गेल्‍यावर चालक पळून गेला. या घटनेनंतर वैरांग पोलिसांचे एक पथक घटनास्‍थळी दाखल झाले.
 
Top