सांगोला (राजेंद्र यादव) -: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 122 वी जयंती सांगोला येथे विविध कार्यकमांनी साजरी करण्यास सुरवात झाली असून रविवारी सकाळी ध्वजारोहण, समता रॅली, अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण, समाजभूषण पुरस्कार वितरण आदी विविध कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
      सकाळी भीमनगर येथे आमदार गणपतराव देशमुख, आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी नगराध्यक्ष प्रा. प्रबुध्दचंद्र झपके, माजी नगराध्यक्ष तथा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रफिक नदाफ, बाबूराव गायकवाड, श्रीकांत देशमुख, शहराध्यक्ष बाळासाहेब मस्के, शिवसेना तालुका प्रमुख मधुकर बनसोडे, शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब, नगरसेवक, नगरसेविका आदी मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला तसेच पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. भीमनगर येथून निघालेल्या समता रॅलीत हजारो तरुण भीमसैनिक सहभागी झाले होते. रॅलीच्यावतीने शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. 
      त्यानंतर भीमनगर येथे झालेल्या कार्यक्रमात ध्वजारोहण, प्रतिमापूजन, बुध्दवंदना तसेच समाजभूषण पुरस्कारांचे वितरण आमदार दीपकआबा व माजी आमदार शहाजीबापूंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, महिला व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालक बापूसाहेब ठोकळे यांनी केले. सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.
 
Top