उस्मानाबाद -: पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शहरासाठी असलेल्या  पाणी पुरवठयाच्या योजनेची कामे तात्काळ पूर्ण करावीत, असे प्रतिपादन पालकमंत्री  मधुकरराव चव्हाण यांनी केले.
   येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय पाणीटंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री चव्हाण बोलत होते.
    जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, जि.प.उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत हजारे, महावितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता श्री.राठोड, जीवन प्रधिकरणाचे कार्यकारी अभियंता भालेराव, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागचे कार्यकारी अभियंता तांगडे, उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर, संबंधित नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच  संबंधित अधिकारी  उपस्थित होते.
       जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होण्यासाठी शासनाने पशुधन संवर्धनासाठी पाण्याच्या टाक्या, चाऱ्यासाठी  छावण्या उभारण्यावर खर्च केला असून पशुधन जगले पाहिजे यासाठी  पाण्याचे हौद उपलब्ध करुन देण्याचा प्रश्नही तात्काळ मार्गी लावावा, अशा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. तसेच पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून बोअरचा सर्वे करावा. खोदलेल्या हाय फिल्ड बोअरवर तातडीने मोटारी बसवाव्यात. तात्पूरत्या पूरक नळ पाणी पुरवठा योजना तातडीने कार्यान्वित कराव्यात. शहरासाठी पाणी वाटप होताना योग्य रितीने त्याचे वाटप व्हावे जेणेकरुन पाण्यावरून कोठेही तंटे होऊन नयेत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या. 
     जिल्ह्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून चालू असलेली कामे व उपस्थित मजूरांची संख्या तसेच दुष्काळी तालुक्यातील सेल्फवरील कामांची माहिती घेतली. जास्तीत जास्त मजूरांना  रोजगार उपलब्ध करुन द्यावेत, असे निर्देशही  त्यांनी या बैठकीत दिले.
 
Top