बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- सोलापूर जिल्हा परिषद आवारात असलेल्या सहकारमहर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्याची समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आली. त्याचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात दिसून आले. जनसेवा संघटना व विजय प्रताप युवा मंचच्या वतीने बार्शीतील शासकिय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन सदरच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
    यावेळी बोलतांना संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा.साहेबराव देशमुख व सुनिल पवार यांनी बुधवारी दि.३१ रोजी सोलापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली. जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य शेतकर्‍यांचे दैवत असलेल्या सहकारमहर्षि शंकरराव मोहिते पाटील यांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या पुतळ्याच्या विटंबनेमुळे गालबोट लागले असून जिल्ह्यातील सर्व ठिकाणहून त्याबाबत निषेध केला जात आहे. सदरच्या प्रकरणानंतर खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे. समाजकंटकाकडून वारंवार थोर पुरुषांची विटंबना करण्याचे प्रकार वाढत असल्याने अशा दुष्ट प्रवृत्तींना जनसेवा संघटना व विजय प्रताप युवा मंचच्या वतीने ठेचून काढू असेही साहेबराव देशमुख यांनी यावेळी म्हटले.
    बार्शी तालुक्यातील जनतेच्या वतीने तसेच शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आपण व्यक्तीश: निषेध व्यक्त करत असल्याचे सांगीतले. सदरच्या घटनेची संपूर्ण चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी जनसेवा संघटना, विजय प्रताप युवा मंच, मोहिते पाटील समर्थक यांच्या वतीने संयुक्तपणे करण्यात आली आहे.
    या पत्रकार परिषदेसाठी विजय प्रताप मंचचे अध्यक्ष प्रा.साहेबराव देशमुख, बार्शी तालुका राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष ऍड्.अनिल पाटील, जनसेवाचे जिल्हा सरचिटणीस सुनिल पवार, बाबासाहेब शिंदे, बाळासाहेब पाटील, नरेंद्र नलावडे, कौरव माने, अनिल डिसले, धनाजी गायकवाड, उमेस भोसले आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top