उस्मानाबाद :- ढोकी (ता. उस्‍मानाबाद) येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्राच्‍या शिपायाकडून वैद्यकीय रजा मंजूर करण्‍यासाठी तीन हजार रुपयाची लाच घेताना जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. रईस हाश्‍मी यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पडकले. ही कारवाई गुरुवार दि. 24 जुलै रोजी सकाळी डॉ. हाश्‍मी शासकीय निवासस्थानी करण्यात आली. या प्रकरणी संजय राठोड या कर्मचार्‍याने तक्रार केली होती.
    संजय राठोड हे ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई आहेत. ते वैद्यकीय रजेवर होते. पून्हा रुजू होताना तेथील वैद्यकीय अधिकार्‍याने त्यांना जिल्हा आरोग्य अधिकारी रईस हाश्मी यांच्याकडे पाठविले. हाश्मी यांनी राठोड यांना रुजू करून घेण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागितली. राठोड यांनी सुरुवातीला 7 हजार दिले. उर्वरित तीन हजार नंतर देण्याचे ठरले. यादरम्यान एक महिनाभर हाश्मी यांच्या घरी सकाळचा नास्ता आणि फळांची व्यवस्था करण्यास सांगितले होते. यानंतर राठोड ढोकी येथे रुजू झाले.
    रईस हाश्मी 19 जुलै रोजी लातूरच्या दौर्‍यावर होते. या दरम्यान ते ढोकी आरोग्य केंद्रात गेले. यावेळी त्यांनी राठोड यांच्याकडे उर्वरित तीन हजार द्यावेच लागतील, असे बजावले. राठोड यांनी उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. गुरुवारी सकाळी सापळा लावण्यात आला. हाश्मी यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानीच तीन हजार रुपये घेताना पकडण्यात आले.
    पोलिस अधीक्षक संजय बावीस्कर, अप्पर अधीक्षक नेकलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबादच्या उपाधीक्षक अश्विनी भोसले, निरीक्षक आसिफ शेख, एस. एन. बाचके, कर्मचारी चंद्रकांत देशमुख, दिलीप भगत, सुधीर डोरले, नितीन सुरवसे, बालाजी तोडकर, राहुल नाईकवाडी व चालक राजाराम चिखलीकर यांनी ही कारवाई केली.
    शिक्षण संस्थाचालक, त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस मुख्यालयातील दोन कर्मचारी आणि आता जिल्हा आरोग्य अधिकारी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकले आहेत. तीन घटना पंधरा दिवसांत घडल्या आहेत.
 
Top