बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- राज्यातील सुमारे दिड कोटी लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) मध्ये समाविष्ट करावे या मागणीसाठी बार्शीतील धनगर समाज कृती समितीच्या वतीने कुर्डूवाडी रस्त्यावर पोस्ट चौकात सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे वाहतुक विस्कळीत झाली होती. सकाळी ११ च्या सुमारास शहर व तालुक्यातील धनगर समाजातील कार्यकर्ते पिवळे ध्वज, ढोल व हळदीची उधळण करत घोषणा देत होते. पोष्ट चौकात धनगर समाजबांधवांनी एकत्र येऊन शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. धनगर समाजाच्या रास्त मागण्यांसाठी शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी रास्ता रोकोच्या ठिकाणी हजर राहून जाहीर पाठींबा दिला. पालकमंत्री दिलीप सोपल यांना निवेदन देण्यात आले त्यांनी याबाबत पाठपुरावा करु असे आश्वासन दिले आहे. शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, राजेंद्र मिरगणे यांनी या आंदोलनास पाठींबा दर्शविला आहे.
    धनगर जातीच्‍या नमोल्‍लेखात झालेल्‍या त्रुटीमुळे अनेक वर्षापासून हा समाज अनुसुचित जमाती या सवलतीपासून वंचित राहिला आहे. शिक्षणाबरोबरच नोकरीतही आरक्षण मिळावे, या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार गायकवाड यांना देण्‍यात आले.   
    यावेळी नारायण मारकड, विश्‍वास शेंडगे, आरपीआयचे तानाजी बोकेफोडे, धनगर समाज आरक्षण कृती समितीचे बसवराज कुंटोजी, आप्‍पा शेंडगे, प्रमोद वाघमोडे, सुभाष शेळके, अॅड. आर.यू. वैद्य, बाळासाहेब पाटील, सचिन वायकुळे, दिपक खरात, बिभीषण पाटील, शितल पाटील, भिकाजी शिंगाडे, अंबऋषी कोळेकर, अरुण वैद्य, पांडुरंग गडदे यांच्‍यासह मोठ्या संख्‍येनी धनगर समाजबांधव उपस्थित होते.
    रास्‍ता रोकोच्‍या ठिकाणी पोलीस निरीक्षक सालार चाऊस, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक डाके, अतुल पोस, सुरेखा धस, युवराज वाळके, पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम यांच्‍यासह पोलिस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला होता.
 
Top