उस्मानाबाद -  विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम लवकरच घोषित होणार आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी (नमुना-6) अर्ज विधानसभा उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकाच्या 10 दिवस अगोदरपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. यामुळे मतदार नोंदणी करुन घेण्यासाठी आता मर्यादीत कालावधी उपलब्ध आहे. तरी सर्व नागरिकांनी त्यांचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची तात्काळ  खात्री करुन घ्यावी. त्यासाठी नागरिकांनी संबंधीत जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा 1800221950 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अथवा http://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 नंतर दि.9 जून,2014 ते 30जून,2014 या कालावधीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम  राबविण्यात आला होता. या कालावधीनंतर देखील निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर एकूण 22 लाख नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.
    ज्या नागरिकांना येत्या विधानसभा निवडणूकीसाठी मतदान करण्याकरिता मतदार यादीमध्ये त्यांच्या नावाची नोंद करावयाची असेल त्यांनी संबंधीत मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये किंवा मतदार मदत केंद्रामध्ये आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या पुराव्यासह तात्काळ अर्ज सादर करावा. ज्या नागरिकांकडे जुने मतदार ओळखपत्र आहे . परंतु त्यांचे नाव मतदार यादीमध्ये नाही किंवा वगळले गेले आहे, अशा नागरिकांनी त्यांच्या सामान्य रहिवासाचा पत्ता मतदार ओळखपत्राप्रमाणेच असल्यास जुन्या मतदार ओळखपत्राच्या छायाप्रतींसह नमुना-6 मध्ये अर्ज करणे आवश्यक राहील. त्यांना इतर पुरावे सादर करण्याची गरज राहणार नाही, असे  उपजिल्हा निवडणूक अधिकारी, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.                                                                           
 
Top