उस्मानाबाद –: उस्मानाबाद येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने (निवृत्त) स्टेप अप्स आणि पुश अप्स प्रकारातील विशवविक्रम येत्या 1 डिसेंबर रोजी उस्मानाबाद येथील श्री तुळजाभवानी क्रीडा स्टेडिअम येथे करणार आहेत. त्यापूर्वी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी याच स्टेडिअमवर संविधान दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या प्रमुख उपस्थितीती संविधान उद्देशिकेचे वाचन केल्यानंतर हजारो विद्यार्थ्यांना ते प्रात्यक्षिक दाखविणार आहेत.
         जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे आणि मेजर सासने यांनी पत्रकार परिषदेत या उपक्रमाची माहिती दिली. 
    यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की, प्रशासनातील कोणी अधिकारी अशी आगळीवेगळी कामगिरी करीत असेल तर त्याला प्रोत्साहन देणे प्रशासनाचा प्रमुख म्हणून आवश्यक आहे. त्याचबरोबर, मेजर सासने यांची क्रीडाविषयक आवड आणि त्यातील रुची उस्मानाबादकर क्रीडा रसिकांना माहिती व्हावी, तरुणांच्या मनात शारीरिक तंदुरुस्तीबद्दल आवड निर्माण व्हावी, यासाठी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील सर्व क्रीडाप्रेमींनी दि. 26 रोजी मेजर सासने यांची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी तसेच दि. 1 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मेजर सासने यांच्या विक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी श्री तुळजाभवानी क्रीडा स्टेडिअमवर हजर राहण्याचे आवाहनही डॉ. नारनवरे यांनी केले आहे.
यावेळी मेजर सासने (निवृत्त) यांनी, ते करणार असणाऱ्या विक्रमाविषय माहिती दिली. मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असणारे मेजर सासने हे सध्या येथे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. लष्करात त्यांनी आर्मी फिजीकल ट्रेनिंग कोअर मध्ये सैन्य अधिकारी म्हणून काम पाहिले. भारतीय कुस्ती संघाचे 2008 मध्ये जागतिक सैन्यदल क्रीडा स्पर्धावेळी त्यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच ते मिशन ऑलिंपिक विंग टॅलेंट स्क्वॉटिंग अधिकारी होते.
स्टेप अप्स आणि पुश अप्स प्रकारातील विविध चार विश्वविक्रम मेजर सासने हे उस्मानाबाद येथे नोंदविणार आहेत. याठिकाणी विश्वविक्रमाची संधी मिळणे, हे भाग्यदायी असल्याची भावना मेजर सासने यांनी व्यक्त केली. आपल्या या प्रयत्नांना सर्व उस्मानाबादकरांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केलेय या उपक्रमास पाठिंबा देण्यासाठी शालेय विद्यार्थी, कॉजेज युवक-युवती, क्रीडापटू, विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी, सर्वसामान्य क्रीडाप्रेमी नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
       यापूर्वी त्यांनी दोरीवरील उड्या मारण्याचा विश्वविक्रम केला आहे. सध्या मेजर सासने हे दि. 1 डिसेंबर रोजी  स्टेप अप्स आणि पुल अप्स प्रकारातील चार विक्रम करणार आहेत. यातील ती विक्रम हे यापूर्वी ब्रिटन, अमेरिका, जर्मनी या देशांच्या क्रीडापटूंनी केले आहेत तर एक स्वता मेजर सासने यांनी विकसित केलेला क्रीडाप्रकार आहे.
     या सर्व उपक्रमाबाबत सक्रीय सहभाग नोंदविण्याची इच्छा असणाऱ्या नागरिक मेजर सासने यांच्याशी 9970856438 (ई-मेल – subhash.sasne@gmail.com) यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top