बार्शी - संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा असलेल्या बार्शीच्या सुपुत्र शाहिर अमर शेख यांनी आपले संपूर्ण मानवतेच्या विचारात समर्पित केले परंतु त्यांचे  व्यक्तीमत्व हे बार्शीकरांनाच नीटपणे कळाले नाहीत याची खंत वाटते. त्यांच्या जन्मभूमित त्यांच्याच नावाने पुरस्कार मिळाल्याबद्दल आपण धन्य झालो असल्याचे प्रतिपादन डॉ.माधव पोतदार यांनी केले.
    महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बार्शी शाखेने आयोजित केलेल्या शाहिर अमर शेख राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार स्विकारतांना ते बोलत होते. यावेळी डॉ.माधव पोतदार,पुणे (तेजाची आरती), डॉ.रफिक सूरज, हुपरी,कोल्हापूर (बेबस), प्रा.विलास सिंदगीकर, जळकोट, लातूर (रक्त आणि भाकर) या तिघांना शाहिर अमरशेख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
     रविवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमेश पाटील, विनय संघवी, जयकुमार शितोळे, पां.न.निपाणीकर, मुकूंदराज कुलकर्णी, शब्बीर मुलाणी, भारती रेवडकर, डॉ.सूर्यकांत घुगरे, डॉ.महेंद्र कदम आदी उपस्थित होते.
         डॉ.पोतदार म्हणाले, ५० वर्षांपूर्वी आपला मित्र शाहिर अमर शेख यांच्या व्यक्तीमत्वावर पहिले पुस्तक लिहीले. कमुनिस्ट ही शिवी असल्यासारखे दर्शविण्यात येत असतांना आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतो. त्यांच्यावरील पहिली कथा व ग्रंथ लिहीली ती एक प्रकारची क्रांतीच होती. त्यानंतरही त्यांच्यावर ५ ग्रंथ लिहीले. एकाच लेखकावर इतके ग्रंथ लिहीण्यासारखे व्यक्तीमत्व असलेल्या शाहिर अमर शेख यांच्या कलापथकाबरोबर मी वावरलो, तो नुसता कवि नव्हता तर महाकवि होता. त्यांनी मला पाठविलेल्या सुमारे १६० पत्रांचा अमूल्य ठेवा आहे. आण्णाभाऊ साठे यांना उभे करण्यासाठी शाहिर अमर शेख यांची मोठी तपश्‍चर्या होती. त्यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या कवित्वाची प्रतिभा बार्शीकरांना सतत आठवण करुन देईल. दुसर्‍या महायुध्दाच्या काळात मानवातील संवेदनशीलता संपत असतांना दृष्टेपणाच्या कविता करणार्‍या शाहिर अमरशेखांवर साहित्यीकांतील राजकारणामुळे अन्याय झाल्यामुळे त्यांची उपेक्षा झाली. यापुढील काळात उपेक्षा कमी करण्याचा प्रयत्न व्हावा.   
    डॉ.रफिक सूरज म्हणाले, मागील वीसपंचवीस वर्षांपासून लिहीतांना प्रेरणास्थान असलेल्या शाहिर अमरशेख यांच्या नावाचा पुरस्कार हा आनंददायी आहे. यापूर्वी कवि नारायण सूर्वे यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्यावर त्यांनी माणसांवर लिखान केल्याबद्दलची पाठीवर दिलेली थाप ही आजही प्रेरणादायी आहे. रुढ अर्थाने कमी शिकलेल्या बहिणाबाई चौधरी, आण्णाभाऊ यांच्यासारख्या महान व्यक्ती यांनी निर्माण केलेले साहित्य हे स्वतंत्र विद्यापिठांसारखे आहे. त्यांचे माणुसकीचे गाणे व त्यांच्या नावाने देण्यात येणारे पुरस्कार हे नुसते शोकेसमध्ये ठेवण्यासाठी नसून पुन्हा आणखी चांगले लिखान करण्यासाठी दिलेली जबाबदारी आहे व ते सतत अंकुश ठेवल्याप्रमाणे असेल. प्रा.विलास सिंदगीकर म्हणाले, चळवळीतच आपण वाढलो, जगलो यामध्ये खूप चढउतार आपण पाहिले आहेत. लाल बावटाच्या कलापथकात मी घडलो. पुरस्कार कसे दिले जातात, काही संस्था पुरस्कारासाठी व्यक्तीची निवड कोणत्या बाबींचा विचार करुन करते त्यामुळे खर्‍या साहित्यीकांमध्ये कशा प्रकारे उदासिनता येते हे आपण जवळून पाहिले आहे. साहित्यीकांतील राजकारण्यांमुळे पात्र व्यक्तीचा गौरव होत नाही याची जाणीव अनेक ठिकाणी होते. आदीवासींच्या जीवनाचा अभ्यास करुन लिखान करतांना विदारक चित्र दिसून आले. अनेक विषयांवर लिखान करण्याची प्रेरणा मिळण्यासाठी हा पुरस्कार प्रेरणादायी आहे. विनय संघवी म्हणाले, हा पुरस्कार मिळविलेल्या साहित्यीकांनी जीवनात उच्च प्रतिभा निर्माण होण्यापूर्वी संघर्ष केला त्यामुळे आज सोनेरी दिवस आले आहेत. शाहिर अमरशेख यांच्या जन्मगावीच त्यांचा होत असलेला सन्मान हा त्यांच्यासह बार्शीकरांच्याही दृष्टीने प्रेरणादायी आहे. आपल्या क्षेत्रात वाटचाल करतांना समाज अवलोकन करत असतो. साहित्यातूनच समाजप्रबोधन होते, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कोणत्याही व्यक्तीला शे-दोनशे पाने वाचण्याची सवय कमी होत आहे. सद्यस्थितीत प्रचलित असलेल्या फेसबुक, व्हॉटसअप इत्यादी वेगवेगळ्या माध्यमाचा वापर करुन साहित्यीकांनी आपले विचार समाजापर्यंत पोहोचवावेत व साहित्यीकांची चळवळ यापुढेही निरंतर सुरु रहावी. रमेश पाटील म्हणाले, बार्शीचे सुपुत्र शाहिर अमरशेख यांच्या नावाने हा पुरस्कार असल्याने अभिमान वाटतो. बार्शीकरांना अजूनही खर्‍या अर्थाने शाहिर कळाले नाहीत भविष्यात त्यासाठी प्रयत्न करु. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाहिर अमरशेख यांच्या तैलचित्राचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रसाद सहस्त्रबुध्दे व सहकारी यांनी स्वागतगीत गायले. कवि मुकूंदराज कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले तर शब्बीर मुलाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
 
Top