उस्मानाबाद - सामाजीक न्याय विभाग व विशेष सहाय विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124 व्या जयंती निमित्त सामाजिक सप्ताहात शासकीय योजनांची माहिती व्हावी,यासाठी येथील सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, उस्मानाबाद यांच्यावतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजीक न्याय भवन येथे प्रसारमाध्यमांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक न्यायाच्या योजना तसेच विविध महामंडळांच्या योजनांची माहिती यावेळी प्रसारमाध्यमांना देण्यात आली. 
  या कार्यशाळेस समाज कल्याण सहायक आयुक्त, एस. के.मिनगिरे, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापक श्री डी. ए. काकडे, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे व्यवस्थापक डी.आर. गायकवाड, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापक एम .एन. कांबळे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापक शिंदे  यांची व्यासपीठावर उपस्थिती  होती. 
 मिनगिरे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना सांगितले की, समाजकल्याण व महामंडळाकडील कल्याणकारी योजना या  सामाजिक सप्ताहाच्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत पोहचविण्याचे मोलाचे कार्य हे प्रसार माध्यमे करत असतात. प्रसार माध्यमांना कार्यशाळेच्या माध्यमातून समाजकल्याण विभागाने दुर्बल घटकातील लाभार्थ्यांसाठी  शासकीय वस्तीगहे, निवासी शाळा, विजाभज अनुदानित आश्रमशाळा, शैक्षणिक , कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान, मिनी ट्रॅक्टर, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी रमाई आवास योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, शाहू, फुले परितोषिक, व्यसनमुक्ती पुरस्कार देण्यात येतात. जिल्हा वार्षीक योजनेतून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या कल्याणासाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जातीच्या औद्योगिक सहकारी संस्थांना अर्थसहाय्य देण्याची योजना, अत्याचारास बळी ठरणा-या अनुसूचित जाती व अनु. जमतीच्या कुटूंबातील सदस्यांना अर्थसहाय्य देण्याची योजना, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना  आणि सामाजीक न्याय विभाग व विविध महामंडळामार्फत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांकरीता कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ देण्यासाठी एकाच छत्राखाली लाभार्थींना लाभ मिळावा यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन निर्माण केले असल्याचेही श्री. मिनगिरे यांनी सांगितले.
विविध महामंडळाच्या व्यवस्थापकांनी आपल्या महामंडळाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांची सविस्तर देऊन महामंडळामार्फत प्रत्येक आर्थीक वर्षातील लाभार्थींची संख्या व वर्षनिहाय कर्ज वाटप बाबतही माहिती यावेळी प्रसार माध्यमांना दिली. दि.8 एप्रिल ते 14 एप्रिल,2015 या कालावधीत हा सामाजिक समता सप्ताह साजरा केला जात आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन राज्यातील सर्वच जिल्ह्यात केले जात आहे. या सप्ताहाचा शुभारंभ नुकताच डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते झाला. या सप्ताहात दि.11 एप्रिल, 2015 रोजी रक्तदान शिबीराचे व व्यसनमुक्ती कार्यक्रम, दि.12 रोजी सर्व शासकीय कार्यालय/स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने स्वच्छता अभियान, दि.13 रोजी समाज प्रबोधनपर तर दि.14 रोजी  सामाजिक सप्ताह अशा विविध कार्यक्रमानी या सामाजिक समता सप्ताहाची सांगता होणार आहे.       
 
Top