Thursday, 29 April 2021

राज्याचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

                                       
उस्मानाबाद,दि.२९ :
 राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक  तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे.उपमुख्यमंत्री तथा मंत्री, वित्त व नियोजन  अजित पवार यांच्या हस्ते  ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाले. 

याप्रसंगी उदयोग मंत्री  सुभाष देसाई, नियोजन व वित्त राज्य मंत्री  शंभुराज देसाई, उदयोग राज्य मंत्री श्रीमती आदिती तटकरे, नियोजन विभाग व उदयोग विभागाचे अपर मुख्य सचिव, केंद्रिय सांख्यिकी कार्यालयाचे अधिकारी, उदयोग आयुक्त, अर्थ व सांख्यिकी संचालक, Industry Associates चे प्रतिनिधी, अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग संचालनालयाचे सर्व अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. 


राज्याच्या औद्योगिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे, राज्याचे औद्योगिक धोरण निश्चीत करणे, औद्योगिक विकासाच्या योजना ठरविणे यासाठी औद्योगिक क्षेत्रातील चढउताराचे मोजमाप आवश्यक असते. महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्टया अग्रेसर राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये तसेच एकूण उत्पन्नामध्ये राज्याचा हिस्सा मोठा आहे. 


सदर निर्देशांक राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय उत्पन्न काढणे, देशातील/राज्यातील औद्योगिक प्रगती मोजणे यासाठी तसेच नियोजन करण्याच्या उद्देशाने शासनास अत्यंत उपयुक्त आहे. उद्योग जगतास, याक्षेत्रातील संशोधन तसेच उत्पादन करण-या संस्था यांना नेहमी याची आवश्यकता भासते. केंद्रिय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्यिकी संचालनालय, व उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय, यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. राज्यामधील निवडलेल्या 568 कारखान्यांकडून दरमहा विहित कालावधीत माहिती या वेब पोर्टलवर नोंद करण्याची जबाबदारी उद्योग संचालनालयाच्या महाव्यवस्थापक, जिल्हा उदयोग केंद्र यांचेवर सोपविण्यात आली आहे. माहितीवर संस्करण करून राज्याच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक अर्थ व सांख्यिकी संचालनालय प्रकाशित करणार आहे. 

Labels: