नळदुर्गच्या राजकारण्यांना नेतृत्व करण्याची ज्या ज्या वेळी संधी येते. त्यावेळी हे भले बहाद्दर राजकारणी शेपूट का घालतात हेच कळत नाही. संधी आली की, संधी दवडायची व पुन्हा पाच वर्ष झेलायचे राजकारण करायचे. हे यांच्या रक्तातच भिनलेेले आहे. राजकारणावर विचार करता भल्या-भल्या राजकीय नेत्यांना नळदुर्गच्या राजकारण्यांची मानसिकता कळली नाही.
सध्याच्या राजकारणात तर काय चालू आहे, एक भाऊ कॉंग्रेसचे राजकारण करतो तर दुसरा भाव सेनेचे नेतृत्व करतो, याच पद्धतीने निवडणुका आल्या की, राजकारणांचे खानदान सर्वच पक्षात पळापळ करीत असते. पाच वर्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेवून काम केले तरी नगरपालिकेच्या निवडणुकीत सेनेकडून त्याला उमेदवारी मिळू शकते. ऐनवेळी कॉंग्रेसचा कार्यकर्ता राष्ट्रवादीत उडी मारून उमेदवारी मिळवू शकतो. आतातर वेगळचं चालू आहे. सेना भाजपासह राष्ट्रवादीचे व रिपाइंचेही काही कार्यकर्ते आण्णांच्याच पार्टीचा मी कार्यकर्ता असल्याचे म्हणत आहे. ही यांची कसली पक्षनिष्ठा झाली.
समाजाच्या उद्धारासाठी नाही तर घर खर्चासाठी राजकारण हे नळदुर्गचे काही पुढारी करीत असून हे कधीही समाजसेवा करताना दिसत नाहीत. त्याचबरोबर त्यांना समाजसेवा काय आहे, हे माहित नाही. राजकारण कशाकरिता करता तर स्वत:च्या पोटासाठी करतात. प्रसिद्धीसाठी त्यांना खुर्ची हवी असते. नगरपालिकेत सतरा वार्ड असताना आणि चार प्रमुख पक्ष निवडणुक लढवित असताना, प्रत्येक पक्षाचे सदस्य सभागृहात असताना विरोधकांची भूमिका म्हणावी तशी कोणीही वठवित नाही. त्यामुळे न.प. सभागृहातूनच ‘‘मिल बाट के खावो’’ चा नारा बुलंद झाल्याचे नागरिकांत चर्चा आहे. साधे गटार बांधकाम असो, किंवा खाऊ वाटप असो पंधरा टक्के कमिशनाशिवाय कोणालाही काम मिळत नसल्याचे सर्वश्रूत आहे. तुंबलेली गटार काढायची म्हटल्यास कर्मचार्‍यांकडे जावून गटार काढण्याचे काम दिले तर काही चिरीमिरीची मागणी करतात. मग शहर विकासाची यांच्याकडून काय? अपेक्षा करायची. पाच वर्षांखाली नागरिकांना सत्ता बदलायची संधी आली होती. परंतु मतदारांनी संधीचे सोने केले नाही. तर काही शहरातुन गर्भश्रीमंत होवून आलेल्या व शहरातच न.प. चे लक्तरे तोडून खालेल्या काही पक्षांच्या राजकारणी व्यक्तींनी मतदारांना पैशांचे, कपड्याचे तर तरूण मंडळाना गणवेश देवून मते आपल्या झोळीत पाडून घेतली. त्यामुळे मतदारांची दिवाळी झाली. त्यानंतर पाच वर्ष अश्रू ढाळत बसण्याचे काम करावे लागत असल्याचे बोलले जात आहे. मतदानाचा हक्क विकल्यावर काय नुकसान होते ते आज मतदारांना थोडे बहुत का होईना उमजलेच आहे. आजही सुजान नागरीक रस्सभरीत चर्चा करताना ऐकावयास मिळत आहे.

 
Top