नवरात्र उत्सावानिमित्ताने सध्या लोकगीत प्रकाराला अगळेवेगळे स्थान निर्माण झाले असून डफ, तुणतुण्याचे आवाज सर्वत्र निनादत आहेत. मराठी लोकमाणसावर शाहिरीची मोहिनी फार विलक्षण असून मराठी मनाला टाळमृदंगाप्रमाणेच डफ, तुणतुण्याचे वेड दिसून येते. संत कवितेची जनमाणसावर आलेली मोहिनी कमी करुन आपला प्रभाव निश्‍चित करणारी शाहिरी कविता रुपरंगाने बहरलेली दिसून येते. सामान्य अशिक्षित अशा अवघड मराठी मनाचे दर्शनीक कुतूहल शमविण्यासाठी आणि शृगांरभावाचे सरळ पोषण करण्यासाठी लोकगायक असणार्‍या शाहिरांनी आपली प्रतिभा कारणी लावली व एक नवा अनोखा उन्मेश मराठी कवितेत निर्माण झाला. व्यंजकतेचा आधार न घेता अल्पाक्षरत्वाची जोखीम न पत्कारता अत्यंत नितिनिरपेक्ष असा मोकळा व सालंकृत शृंगार या कवितेतून स्वत:च्या खास अशा पद्धतीने अवतरला. खंडीत झालेल्या संत कवितेची जागा भरुन काढण्याचे सामार्थ्य जे यादवकाळात संत कवितेने केले. ते पेशवेकाळात शाहिरांनी आपल्या लावणी व पोवड्यातून केले. संत कवितेची खंडीत झालेली परंपरा पुढे शाहिरी कवितेने घेतली. त्याबरोबरच तत्कालीन सामाजिक परिस्थितीने लावणीला नैतिक अधिष्ठान होऊ दिले नव्हते आणि संत कवितेतून ईश्‍वर भेटीविषयीची आर्तता, तळमळ दिसून येते. त्यामुळे देव-देवता वर्णनपर लावण्यांना समाज मान्यता मिळाली नसल्याचे दिसून येते. तरी देखील शाहीर राम जोशी यांनी देव-देवता वर्णपर लावण्यांना अधिष्ठान प्राप्त करुन देण्यात यश मिळविल्याचे दिसून येते. 'भूतकाळात जशी या स्थळात' या लावणीतून राम जोशी यांनी महाराष्‍ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानीचे वर्णन मोठ्या सुंदर शब्दात केले आहे. 'भूतकाळात जशी या स्थळात, यमुनाचळात वेल्हाळा, मन सुमन करुनी विषवमन गणुनी रतीरमण शिवाची राणी ही भजता देते नित्य सुखाची खाणी' नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आज ही लावणी लक्ष वेधून घेते आणि उपेक्षित असलेले हे साहित्य या निमित्ताने समाजापुढे यावे ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 
Top