उमरगा : दोन गटात ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या कारणावरुन हंटर, चैन, फायटरने व दगडफेक करून तुफान मारहाण झाल्याची घटना उमरगा तालुक्‍यातील चिंचोली (भु) या ठिकाणी शुक्रवार रोजी रात्री ९ वाजण्‍याच्‍या दरम्‍यान घडली आहे.  याप्रकरणी दोन्ही गटाने एकमेकांविरोधात मुरूम पोलीसात फिर्याद दिल्‍याने ३० जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
         उमरगा तालुक्यातील चिंचोली भुयार येथील ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. येथील माजी उपसरपंच ओमकुमार बाबुराव गायकवाड यांना तु विरुद्ध बाजुने का प्रचार करतोस असे म्हणून विद्यमान तंटामुक्त समितीचे अध्यक्ष झुंबर रघुनाथ गायकवाड, सचिन गायकवाड, इंद्रजित गायकवाड, प्रमोद गायकवाड, रणजित गायकवाड सर्व रा. चिंचोली भुयार व शाम भोसार, गणेश झिंजाळ, भिमा अकाल रा. येवला जि. नाशिक यांनी शुक्रवारी रात्री ९ वाजता हंटर, चैन, फायटरने मारहाण केली. याबाबत ओमकुमार गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील सर्व लोकांविरुद्ध जबर मारहाण करुन गळ्यातील सोन्याची दिड तोळ्याची चैन, ४ हजार रुपये, मोबाईल आदि अवैज लुटून नेल्याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विरोधी गटातील झुंबर गायकवाड व त्यांच्या मुलांना ओम गायकवाड, संजय पाटील, कमलाकर गायकवाड, सुधाकर पाटील, बालाजी गायकवाड, गोपाळ पाटील, सुभाष पाटील यांच्यासह इतर १४ जणांनी संगणमत करुन तुम्ही आमचा विरोध का करता म्हणून हंटर, फायटर, चैनने मारहाण करुन त्यांच्या घरावर दगडफेक करुन दारासमोरील स्कॉर्पिओची तोडफोड केल्याची फिर्याद झुंबर गायकवाड यांनी दिली. त्‍यावरुन वरील सर्व लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करुन मुरुम पोलिसांनी दोन्ही गटातील २० जणांना ताब्यात घेतले आहे. गावात शांतता राहावी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी एम. राजकुमार यांनी मुरूमला भेट देऊन कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आनंदराव निंगदाळे करीत आहेत.

 
Top