सोलापूर -: साहित्य हे समाज, माणुस घडविते. साहित्य हे विषमता दुर करण्यास मदत करते. माणसाला केंद्रबिंदू मानुनच साहित्याची निर्मिती व्हायला हवी किंबहुना साहित्याचा केंद्रबिंदू माणुसच हवा. असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी बार्शी येथे भरलेल्या राज्यस्तरीय मराठी दलित साहित्य सम्मेलनाच्या उदघाटन प्रसंगी केले. अध्यक्षस्थानी दलित साहित्यिका सुवर्णा पवार होत्या. चार्वाक्य, बुध्द, कबीर, महात्मा ज्योतीबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही सर्व वैचारिक परंपरेचे प्रतिनिधी यात झुंजी लावण्याचे काम करु नये असे आवाहन करतानाच भविष्यात भाकरी विरुध्द बर्गर असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता श्री. कांबळे यांनी यावेळी व्यक्त केली. दलित साहित्य हे शोषीतांचे वास्तव मांडते. त्याच बरोबर हे साहित्य बंधमुक्त जिवनाचे चित्र रेखाटते. असेही श्री. कांबळे म्हणाले.
दलित हि एक वेदना आहे. जे उपेक्षित वंचित मग ते कोणत्याही जाती धर्मातले असो त्यांच्या यातना जाणणारे, मांडणारे साहित्य म्हणजे दलित साहित्य होय. जाती विषमता दुर करण्याबाबत प्रत्येकाने स्वत:पासुन प्रयत्न करायला हवे. असे मत या संम्मेलनाच्या अध्यक्षा सुवर्णा पवार - खंडागळे यांनी व्यक्त केले. तर दलितसाहित्य हे क्रांतीचे विज्ञान असून हे विज्ञान सर्वांनी समजावून घ्यावे तसेच दलित लेखनाकडे गांभिर्याने पाहण्याची आवश्यकता असून या साहित्याबद्दल गल्लत नको अशी भुमिका सम्मेलनाचे प्रमुख पाहुणे माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी मांडली. प
सामाजिक परिवर्तन व नवसमाजाची निर्मिती हे दलित साहित्याचे महत्वाचे उदिष्ट असल्याचे स्वागताध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव यांनी सांगितले. प्रारंभी ग्रंथदिंडीने या संम्मेलनाचे सुरुवात करण्यात आली. दोन दिवशीय चालणा-या या संम्मेलनामध्ये कवी संम्मेलन, परिसंवाद, नाटक, आयपीएस अधिकारी रमेश घोलप यांची मुलाखत, शाहिरी जलसा, विशेष व्याख्यान आणि राज्यातील दलित, बहुजन चळवळीतील कार्यकर्ते, कलावंत यांचा गुणगौरव आदि कार्यक्रमांचा समावेश आहे.
या प्रसंगी माजी आ. उत्तम प्रकाश खंदारे, अड. एकनाथ आव्हाड, लहु कानडे, जेष्ठ पत्रकार राजा माने, डॉ. गुलाबराव पाटील, प्रा. कॉम्रेड तानाजी ठोंबरे, संयोजक श्रीधर कांबळे, उमेश पवार, प्राचार्य डॉ. मधुकर फरताडे, प्रा. डॉ. भारती रेवडकर, प्रा. शिवकुमार कांबळे आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात, संत तुकाराम सभागृहामध्ये भरलेल्या स्व. डॉ.कुंदाताई जगदाळे, साहित्य नगरीमध्ये होणा-या या वैचारीक संम्मेलनाचा आस्वाद साहित्यप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
