उस्मानाबाद -: दि. 21 ऑक्टोबर 1959 रोजी हॉट स्प्रिंग्ज या सिमेवरील बर्फाच्छादीत निर्जन ठिकाणी गस्त घालणा-या भारतीय जवानावर चीनी सैनिकांनी अमानुष हल्ला केला. तेव्हा दहा भारतीय जवान शहीद झाले होते. तेव्हापासून त्या वीर शहीर शिपायांची आठवण म्हणून दरवर्षी दि. 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा स्मृती दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो. पोलीसांना कायदा व सुव्यवस्थेबरोबर गुंड, अतिरेकी, दहशतवाद व समाजद्रोही लोकांचा सामना करावा लागतो. तेंव्हा ब-याच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्राण गमवावे लागतात. त्यांच्या स्मृतीस पुष्पचक्र अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात येते.
भारतात दि. 1 सप्टेंबर 2011 ते दि. 31 ऑगस्ट 2012 या कालावधीत आपले कर्तव्य बजावित असताना एकुण 655 पोलीस अधिकारी व पोलीस जवान शहीद झाले, त्यांच्या स्मृतीला पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे यांच्या शुभहस्ते रविवार दि. 21 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता पोलीस मुख्यालय उस्मानाबाद येथील पोलीस हुतात्मा स्तंभाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी या कार्यक्रमास नागरीक, पत्रकार, विविध संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, व्यापारी, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शाळा, महाविद्यालय येथील शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.
