मुंबई -: मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा अत्यल्प असल्याने जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व बाजूकडील धरणातून एकूण नऊ टी.एम.सी. पाणी त्वरित सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.
        जायकवाडी धरणात विविध धरणातून पाणी सोडून त्याचा वापर औरंगाबाद विभागात करण्याबाबतच्या नियोजनाची बैठक नुकतीच विधानभवन येथे झाली. यावेळी मंत्री सर्वश्री छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे-पाटील, बाळासाहेब थोरात, सुनील तटकरे, जयदत्त क्षीरसागर, रामराजे निंबाळकर, बबनराव पाचपुते, राजेश टोपे, लक्ष्मण ढोबळे, राजेंद्र दर्डा, मधुकर चव्हाण, वर्षा गायकवाड, राज्यमंत्री सर्वश्री प्रकाश सोळंके, डी.पी.सावंत, राजेंद्र मुळक, तसेच मराठवाडा, नाशिक, नगर विभागातील आमदार, जलसंपदा विभागाचे सचिव व्ही.गिरीराज, एकनाथ पाटील, ऊर्जा, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
      या बैठकीत जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यासंदर्भात सादरीकरण झाले. धरणात प्रकल्पिक पाणी साठा एकूण 2909 दलघमी (102.73 टीएमसी) इतका आहे. यापैकी 738 दलघमी (26.06 टीएमसी) हा अचल (डेड) असून उपयुक्त पाणी साठा 2171 दलघमी (76.67 टीएमसी) इतका आहे. धरणातील उपलब्ध असलेल्या अचल साठ्यातील पाणी जास्तीत जास्त कसे वापरता येईल तसेच सुरक्षित पाणी पातळी पर्यंत औरंगाबाद पाणी पुरवठा, औद्योगिक पाणी पुरवठ्याचा पंप किती खोलीवर जाऊन उपसा करु शकतील, या बाबतची चर्चा करण्यात आली.
     जायकवाडी धरणात साधारणपणे पातळी 454.50 मीटर पर्यंत धरणातील गाळ तसेच बाष्पीभवन व्यय विचारात घेता 31.7.2013 पर्यंत निव्वळ उपलब्ध असणारे 43.60 दलघमी (1.54 टीएमसी) इतका पाणीसाठा आहे. औरंगाबाद विभागाकरिता पाण्याचे औद्योगिक तसेच जायकवाडी जलाशयावरील उभ्या पिकास संरक्षणात्मक पाणी देण्याच्या दृष्टीने विचार करण्यात आला. त्यानुसार जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागात दारणा समूह, गंगापूर समूह, उर्ध्व गोदावरील प्रकल्‍प समूह, मुळा समूह, प्रवरा समूह हे पाच धरण समूह आहेत. या धरण समुहामधून नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील पिण्याचे व औद्योगिक पाणी वापरानंतर शिल्लक असणारे पाणी अंदाजे 18 टीएमसी इतके आहे. यापैकी उर्ध्व भागासाठी 9 टीएमसी तर जायकवाडी धरणासाठी 9 टीएमसी पाणी देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 
     अचल साठ्यातील पाण्याचा वापर पिण्यासाठी होण्याच्या दृष्टीने औरंगाबाद पाणीपुरवठा योजना, औद्योगिक पाणीपुरवठा व इतर जलाशयावरील योजनांकरिता दुय्यम योजना त्वरित राबविण्यात यावी. जायकवाडी जलाशयातून सध्या बांधकामाधीन असलेली जालना-अंबड पाणीपुरवठा योजना त्वरित कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबरोबरच पाणी शेवटपर्यंत जाण्यासाठी देखील महत्त्वाच्या उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यात जायकवाडी जलाशयावरील वैयक्तिक उपसा सिंचन योजनांवर पाणी प्रवाह सुरु असताना तसेच 31 जुलै 2013 पर्यंतच्या कालावधीत नियंत्रण ठेवून बंद ठेवण्याबाबत कार्यवाही करावी. परिणामकारक नियंत्रणासाठी सिंचनाकरिता तसेच पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र विद्युतपुरवठा फिडर त्वरित करण्यात यावा. जलाशयाच्या नदी पात्रातील सुरुवातीच्या बुडीत क्षेत्रातील सर्वेक्षण करुन पोहचणाऱ्या पाण्याचा कमीतकमी वहनव्यय होण्याच्या दृष्टीने या भागातील तसेच पैठण धरणातील डाव्या कालव्याच्या पोहच कालव्यातील हजार मीटर लांबीतील दुय्यम उपसा योजना राबविण्यासाठी आवश्यक गाळ ड्रेजिंगद्वारे काढण्याबाबत आवश्यकतेनुसार त्वरित कार्यवाही करावी, पाणीपुरवठा सुरु असताना नदीकाठच्या गावांचा वीजपुरवठा खंडित ठेवावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांचे अभिनंदन

             मराठवाड्याला पाणी सोडण्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
 
Top