मुंबई : चैत्यभूमी सुशोभिकरणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी परवानगी घेण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना दिले.
चैत्यभूमी सुशोभिकरणाच्या प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सुकाणू समितीच्या शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
दुस-या टप्प्याच्या कामासाठी सीआरझेडच्या जुन्या नियमानुसार परवानगी नाकारण्यात आली आहे. परंतु जानेवारी 2011 मध्ये सीआरझेडची नवीन नियमावली आली आहे. त्यानुसार या कामासाठी परवानगी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतरच प्रकल्पाची पुढील कामे करणे शक्य होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यानी यावेळी केले.
सुरूवातीला महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी चैत्यभूमी सुशोभिकरणाच्या प्रकल्पाच्या आजवरच्या कार्याबाबतचा आढावा घेऊन प्रस्तावित प्रकल्पाचे सादरीकरण केले. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सर्व कामे पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्याचे काम भारतीय बौद्ध महासभेने करण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने 25 कोटी रुपये मंजूर केले असून महानगरपालिकेला 21 कोटी रुपये दिले आहेत. यातील 8.33 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
चैत्यभूमी लगतच असलेली इंदू मिलची जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी मिळविण्याबाबत आपले प्रयत्न सुरु असून यादृष्टीने पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ही जागा लवकरात लवकर कशी मिळविता येईल यादृष्टीने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आनंद शर्मा यांच्याशीही आपली चर्चा झाली असून त्यांच्याकडूनही लवकरच मान्यता मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यासाठी महाराष्ट्रातील खासदार आणि केंद्रीय मंत्री यांचेही सहकार्य घेतले जाईल आणि हा प्रश्न लवकरात लवकर निकालात काढला जाईल, असे मुख्यमंत्र्यानी सांगितले.
चैत्यभूमीवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण झाल्यास आंबेडकरी जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण होईल, अशी सदिच्छा याप्रसंगी समितीच्या सर्व सदस्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या कामासाठी पुढाकार घेतल्याने या प्रकल्पाला गती मिळाल्याबद्दल सर्व सदस्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
या बैठकीत सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, मुंबईचे पालक मंत्री आणि ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, महिला व बाल विकास मंत्री प्रा.वर्षा गायकवाड, विधान सभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, मुख्य सचिव जयंतकुमार बाँठिया, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि श्रीकांत सिंह, प्रधान सचिव वित्त सुधीर श्रीवास्तव, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, समितीचे सदस्य आनंदराव खरात, जोगेंद्र कवाडे, आनंदराज आंबेडकर, महापालिकेतील विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
* सौजन्य महान्यूज
* सौजन्य महान्यूज