नळदुर्ग -:येथील नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती म्हणावी तशी नाही त्यामुळे नळदुर्ग शहराला पाणीपुरवठा सुरळितपणे करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. नळदुर्गच्या कुरनूर मध्यम (बोरी धरण) प्रकल्पात उपलब्ध असलेला पाणीसाठा अपुरा पडत असून पाणीपुरवठा योजनचे काम करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यानी विशेष बाब म्हणून तातडीच्या पाणीपुरवठा योजनांतर्गत किंवा तेराव्या वित्त आयोग योजनेमधून सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी २५ लाख रुपये अनुदान मंजूर करण्याची मागणी प्रभारी नगराध्यक्ष शहबाज काझी यांनी जिल्हाधिकार्‍याकडे केली आहे.
          यावर्षी बोरीधरण पाणलोट क्षेत्रात म्हणावे तितके पर्जन्यमान झाले नाही. त्यामुळे धरणामध्ये सध्या पाण्याचा अपुरा मृतसाठा आहे. नळदुर्ग शहराला यापुढे पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.
          कुरनूर धरणातील पाण्याचा साठा अपुरा असल्याने जॅकवेलमध्ये पाणी घेण्यासाठी सध्या जॅकवेलपर्यंत  जेसीबीने मोठा खड्डा करुन पाण्याचा प्रवाह जॅकवेलपर्यंत नेण्यात आला आहे. मात्र तो पाणीसाठा पंधरा दिवस पुरेल एवढाच आहे. त्यानंतर धरणातील पाण्याचा साठा जॅकवेलपर्यंत नेण्यासाठी मोठा बांध घालणे गरजेचे आहे. त्या बांधावर २५ एचपीच्या दोन मोटारी बसवून धरणातील पाणी जॅकवेलपर्यंत नेणे आवश्यक आहे. त्याशिवाय शहरात पाणी पुरवठा होवू शकणार नाही. 
            जॅकवेलवरील विद्युत मोटारी चालविण्यासाठी सरासरी ४५० व्होल्टेजची आवश्यकता आहे. मात्र सध्या ३८० ते ४०० व्होल्टेज येत असल्यामुळे विद्युत मोटारी दर २० ते २५ मिनिटानंतर बंद होतात. त्यामुळे नेहमी मोटार जळत आहे. मोटार वारंवार जळत असल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होतो. त्यामुळे त्या ठिकाणी स्टेबीलायझर बसविणे गरजेचे आहे. एकूण शहरात एकूण २६ विंधन विहिरीर असून त्यापैकी १४ विंधन विहिरीवरील विद्युत पंप जुने २० वर्षापूर्वीचे आहेत. त्यामुळे ते पंपही वारंवार जळतात. सदर विद्युत पंप जुने झाले असल्याने त्याचा वार्षिक दुरुस्ती खर्च नवीन पंपाच्या किंमतीपेक्षा अधिक होत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नवीन पंप बसविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सध्या असलेली पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत कार्यान्वित करण्यात आलेली आहे. मात्र या योजनेतील कामे व्यवस्थित झाली नसल्याने वारंवार अडर्चीी येत आहेत. जॅकवेलवरील फळ्या पूर्णपणे कुजलेल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी कर्मचार्‍यांना काम करणे अवघड झाले आहे. नगरपरिषदेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने पाणीपुरवठा व्यवस्थापनाची कामे करणे नगरपरिषदेला अवघड आहे. त्यामुळे हे सर्व कामे करुन घेण्यासाठी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत किंवा १३ व्या वित्त आयोग योजनेमधून नळदुर्ग नगरपालिकेला जिल्हाधिकार्‍यांनी २५ लाख रुपये अनुदान मंजूर करावे, अशी मागणीही निवेदनात प्रभारी नगराध्यक्ष शहबाज काझी यांनी केली आहे.

 
Top