मुंबई -: मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याला आज दिलेली फाशी या हल्ल्यातील शहीदांना तसेच निरपराध बळी पडलेल्यांना खरी श्रद्धांजली आहे, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिली.
आज, सकाळी साडेसातच्या सुमारास पुण्याच्या येरवडा कारागृहात अतिरेकी अजमल कसाब याला फाशी दिल्यानंतर गृहमंत्री श्री. पाटील यांनी या शिक्षेची माहिती पत्रकारांना दिली. ते म्हणाले की, मुंबईवर अतिरेक्यांनी केलेला 26/11 चा दहशतवादी हल्ला हा देशावरचा हल्ला होता. यात 166 निरपराधांसह पोलीस अधिकारी-जवान शहीद झाले होते. या हल्ल्याच्या वेळीच 10 अतिरेक्यांपैकी 9 जणांना मोठ्या धैर्याने कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले होते. यातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब याला पोलीसांनी पकडले होते. कसाबच्या शिक्षेसाठी विशेष न्यायालय कार्यन्वित करण्यात आले होते. त्यांनी कसाबला मुंबईवरच्या हल्ल्यात दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली होती.
मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेदेखील विशेष न्यायालयाने कसाबला सुनावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. कसाबने केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर इतर सर्व बाबींची पूर्तता करुन आज, सकाळी 7.30 वाजता अतिरेकी अजमल कसाबला फाशी देण्यात आल्याचे गृहमंत्री श्री. आर.आर.पाटील यांनी सांगितले.
अतिरेकी अजमल कसाबला झालेल्या फाशीमुळे भारतावर हल्ला केला तर येथील सर्व यंत्रणा चोख उत्तर देतातच शिवाय कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा होते, हा संदेश जगापर्यंत पोहोचल्याचेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, आज कसाबला फाशी दिल्यानंतर गृहमंत्री श्री. पाटील यांनी गिरगाव चौपाटीवरील शहीद तुकाराम ओंबाळे यांच्या स्मारकाला तसेच पोलीस जिमखान्याजवळील शहीद स्मारकाला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले आणि शहीदांना श्रद्धांजली वाहिली.